सत्ताधार्‍यांच्या कुरघोड्या तर विरोधकांच्या धरसोड वृत्तीत पालिकेची 5 वर्षे संपली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२१ । मुंबई । प्रसन्न रूद्रभटे 2016 साली विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजेगटाची सत्ता लोकनियुक्त नगराध्यक्षांसह स्थापन झाली. राजेगटाकडे पालिकेची एक हाती सत्ता असली तरी विरोधकांचा आकडाही लक्षणीय होता. अशा परिस्थितीत पालिकेच्या कारभारात विकासाची चढाओढ नागरिकांना अपेक्षित असताना सत्ताधार्‍यांच्या आपापसात कुरघोड्या तर विरोधकांच्या धरसोड वृत्तीतच पालिकेची 5 वर्षे संपली असल्याचे बोलले जात आहे.

पालिकेच्या गेल्या निवडणूकीत राज्यामध्ये असलेल्या तत्कालीन महायुतीच्या सरकारमुळे बर्याच वर्षांनतर नगराध्यक्षांची निवड जनतेतुन करण्यात आली. जिल्ह्यामध्ये कराड व वाई येथे बहुमत एका पक्षाकडे तर नगराध्यक्ष दुसर्या पक्षाचा, असे विरोधी चित्र पाहयला मिळाले. फलटणमध्ये मात्र नगराध्यक्ष व संपुर्ण बहुमत हे राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजेगटालाच मिळालेले होते. सत्तेच्या सोंगट्या संपूर्णपणे आपल्या बाजूने असताना विकासकामांवर भर देण्याऐवजी सत्ताधारी मंडळीमध्येच आपापसात कुरघोडीचे राजकारणच पाच वर्षे चालत गेले. आपल्याच पार्टीच्या नगराध्यक्षांना किंवा नगरसेवकांना कोंडीत पकडण्याचे काम विरोधकांऐवजी सत्ताधारी नगरसेवकच करीत होते. आणि याउलट विरोधक मात्र त्यांच्या फेटाळलेल्या सुचना व उपसुचनांच्या विरोधात जिल्हाधिकारी महोदयांकडे तक्रारी दाखल करण्यात जास्त काळ व्यस्त होते. सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने विरोधकांनी कामकाज केले पाहिजे त्यात ते पूर्णत: यशस्वी झाल्याचे अजिबात म्हणता येणार नाही. काही विषयांमध्ये विरोधी नगरसेवकांनी ‘ आपले काम’ झाल्यावर तो विषय तिथेच सोडून दिलेले सुध्दा बघायला मिळाले आहेत. पालिकेच्या सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही कारभार्‍यांकडून विकासकामांची अपेक्षा ठेवणार्‍या नागरिकांचा यातून बहुतांशी प्रमाणात भ्रमनिरास झाला असून याची प्रतिक्रिया ती मतपेटीतूनच व्यक्त करतील असेही अनेक सूज्ञ नागरिक बोलत आहेत.

पालिकेतील ‘इंटर्नल पॉलिटीक्स’चा थोडक्यात कानोसा घेतल्यानंतर अनेक धक्कादायक बाबींची चर्चा पालिकेच्या राजकीय वर्तृळात सध्या सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. नगराध्यक्षा ह्या लोकनियुक्त आहेत हे सत्ताधारी मंडळीना रूचायलाच पहिलं वर्ष गेल. त्यानंतर दुसर्या वर्षामध्ये नगराध्यक्षांंना कोणकोणत्या प्रकारे अडचणीत आणता येईल याचा शोध घेण्यात व त्याबाबत केलेल्या काही प्लॅन्सचे इंम्लीमेंटेशेन करण्यामध्ये गेले. विशेष म्हणजे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी गटाचे नगरसेवक हे यशस्वीही झाले. त्यानंतरच्या काळानंतर राजेगटाकडून स्वीकृत नगरसेवक असलेल्या अभिजीत भोंसले यांच्याजागी पांडुरंग गुंजवटे यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर नगरपालिकेचा बहुतांश म्हणण्याऐवजी सर्वच कारभार हे पांडुरंग गुंजवटेच चालवू लागले. नगराध्यक्षा सौ. निता नेवसे व त्यांचे पती मिलिंद नेवसे यांच्या कारभारावर सत्ताधारी नगरसेवकांनीच पार्टी मिटिंगमध्ये आरोप केले जाऊ लागले. त्यानंतर नगरपरिषदेचा कारभार हा स्वीकृत नगरसेवक पांडुरंग गुंजवटे हेच बघू लागले. सन 1985 पासुन नगरपरिषदेची पायरी अन् पायरी माहीत असल्याने पांडुरंग गुंजवटे यांना पालिकेच्या कारभारावर पकड मिळवण्यास कसलीही अडचण आली नाही. सत्ताधारी नगरसेवकांनीसुद्धा नगराध्यक्षांकडे पाठ फिरवून आपापली कामे ही पांडुरंग गुंजवटे यांच्याकडूनच करुन घेण्यात धन्यता मानली. फलटण नगरपरिषदेमध्ये उपनगराध्यक्ष स्व. नंदकुमार भोईटे यांनी अनेक वेळा नगराध्यक्षा सौ. निता नेवसे यांना अडचणीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले होते. पांडुरंग गुंजवटे यांची नगरसेवक म्हणून निवड झाल्यानंतर उपनगराध्यक्ष स्व. नंदकुमार भोईटे व पांडुरंग गुंजवटे हे कायम सोबतच असायचे. पांडुरंग गुंजवटे यांचा नगरपरिषदेचा अभ्यास व नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्यावर असलेला वचक ह्या गोष्टींमुळे नगरपरिषदेमध्ये कामकाज पाहताना पांडुरंग गुंजवटे यांना अडीअडचणी आल्या नाहीत. जरी आल्या तरी त्यांना कोणत्या प्रकारे थोपवायचे हे पांडुरंग गुंजवटे यांना चांगल्याप्रकारे माहीत होते. त्यामुळे अशा कुरघोड्यांच्या राजकारणात ते पुढे पुढे सरसावत गेले.

फलटण नगरपरिषदेमध्ये ठराविक नगरसेवक सोडले तर इतर नगरसेवकांना पालिकेचे कामकाजाची अजूनपर्यंत कळले काही नाही? हा सुद्धा भला मोठा प्रश्‍न आहे. कित्येक नगरसेवकांना नगरपालिका समजलीच नाही. काही नगरसेवकांना तर आपल्या प्रभागात सुरू असलेल्या कामांची टक्केवारी मिळत नाही म्हणून कांगावा केलेला होता. त्याचे पुढे काहीही झाले नाही. टक्केवारी तर मिळालीच नाही व नंतर फक्त मिरवण्यापुरते नगरसेवक उरले.

पालिकेतील विरोधकांच्या कामगिरीचा लेखा-जोखा तपासला तर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली विरोधी नगरसेवक कार्यरत होते. ज्याप्रमाणे सत्ताधारी मंडळींनी अंतर्गत कुरघोडीतच टर्म घालवली त्याचप्रमाणे विरोधकांमध्ये सुध्दा अंतर्गत राजकारण होतेच. विरोधी असलेल्या 8 नगरसेवकांच्या पैकी काही ठराविक नगरसेवकच आपापल्या प्रभागात सक्रीय होते. त्यामध्ये सुध्दा हातामध्ये घेतलेला विषय ते काही काळातच सोडून देत होत. पालिकेच्या विरोधातला कोणताही विषय विरोधक मॅनेज होण्यापुरताच हातामध्ये घेतात, असे सत्ताधारी नगरसेवक नेहमीच स्पष्ट करित असताना सर्वांनी पाहिले.

आता पालिकेचा पाच वर्षांचा कारभार संपुष्टात येत असून नवीन कार्यकाळासाठी ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर या नेतृत्त्वांनी केवळ मिरवण्यापुरते पद भोगणारे उमेदवार न देता पालिकेत सक्षमपणे काम करेल, सत्ताधारी वा विरोधक म्हणून आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडेल अशांनाच संधी द्यावी अशी अपेक्षा फलटणकर करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!