स्थैर्य, नागपूर, दि.२२: माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपूरला ऑक्सिजनचे पाच टँकर्स उपलब्ध होणार आहेत. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची भेट घेतली आणि संपूर्ण समन्वय घडवून आणला.
कालपासून देवेंद्र फडणवीस हे सिलतरा, रायपूर येथील जयस्वाल्स निको लि. या इंटिग्रेटेड स्टील प्लांटचे सह प्रबंध संचालक रमेश जयस्वाल यांच्याशी संपर्कात होते. देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देऊन पाच टँकर्स देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. मग प्रश्न होता, तो ऑक्सिजन नागपूरला आणण्याचा. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जेएसडब्ल्यूचे संदीप गोखले यांच्याशी संपर्क केला. त्यांनी टँकर्स देण्याचे मान्य केले. त्यानंतर आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांचे जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे करून दिले आणि त्वरेने पुढची कारवाई करण्याची विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा त्वरेने कारवाई करू, असे सांगितले. त्यामुळे आगामी 10 दिवसात 5 ऑक्सिजन टँकर (एक दिवसाआड एक टँकर) नागपूरला उपलब्ध होणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी जयस्वाल्स निको लि.चे कंपनीचे अध्यक्ष बसंतलाल शॉ आणि सह प्रबंध संचालक रमेश जयस्वाल, तसेच जेएसडब्ल्यूचे संदीप गोखले यांचे मनापासून मानले आहेत. चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यावेळी उपस्थित होते.