ठेकेदारी पद्धतीने काम करणार्‍या महिला स्वच्छता कर्मचार्‍यांचे 5 महिन्याचे पगार रखडले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २४ : सातारा नगरपरिषदेमध्ये ठेकेदारी पद्धतीने काम करणार्‍या महिला स्वच्छता कर्मचार्‍यांचे पगार 5 महिने रखडले, त्याच्या निषेधार्थ गणेश दुबळे यांच्या नेतृत्वाखाली सातारा नगर पालिकेच्या समोर निदर्शने करण्यात आली. 

सातारा नगरपरिषद अंतर्गत आरोग्य विभागात स्वच्छता कर्मचार्‍यांच्या सोबत ठेकेदारी पध्दतीने जवळपास 200 महिला स्वच्छता कर्मचारी आहेत. सध्या जगामध्ये कोविड 19 या साथीच्या रोगाने थैमान घातले आहे.हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. अशावेळी जीवाची पर्वा न करता स्वच्छता कर्मचारी काम करत आहे.पालिकेच्या आस्थापनेवरील कायम कर्मचार्‍यांना सर्व सुविधा व वेळेवर पगार होतात. परंतु, ठेकेदारी पध्दतीने काम करणार्‍या महिला स्वच्छता कर्मचार्‍यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत.

त्यासाठी आज रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गणेश दुबळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून नगराध्यक्षा माधवीताई कदम यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने आपल्या अडीअडचणी मांडल्या.

ठेकेदारी पध्दतीने काम करणार्‍या महिला स्वच्छता कर्मचार्‍यांचे गेली 5 महिने थकीत असलेले पगार त्वरीत मिळावेत, स्वच्छता कर्मचार्‍यांचे पीएफ कपात करावी व त्याची पावती मिळावी, ठेका पध्दतीने काम करणार्‍या महिलांचे पगार त्यांच्या खात्यावर जमा करावेत अथवा चेकने पगार द्यावा, कायम कर्मचार्‍यांप्रमाणे साडी, बूट, रेनकोट मिळावेत, कोविड 19च्या पार्श्‍वभूमीवर 50 लाखाचा विमा उतरविण्यात यावा, संबंधित ठेकेदारांची व कामगार प्रतिनिधीची बैठक घ्यावी आदी मागण्या कामगारांनी केल्या आहेत. जोपर्यंत पगार दिले जात नाहीत, तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय कर्मचार्‍यांच्या वतीने घेण्यात आला आहे. 

यावेळी झालेल्या चर्चेवेळी माधवी कदम, लेखापाल हिम्मत पाटील, रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गणेश दुबळे तसेच सुरेखा बडेकर, सावित्रीबाई वाघमारे, रेखा भोसले, सुगंधा गाडे, रत्ना सोनावले, हिराबाई पवार, अलका चव्हाण, सुमन गायकवाड विद्या अडागळे, हिराबाई पवार, जयश्री दाबाडे, संगीता चव्हाण, जयश्री सावंत, पल्लवी राजेंद्र खरात, संगीता प्रकाश चव्हाण, लक्ष्मी सुरेश घाडगे, जयश्री गोविंद दाभाडे आदी स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

मुख्याधिकारी यांच्या दालनात दि.23 जुलै रोजी झालेल्या बैठकीत कर्मचार्‍यांच्या पगार हा ठेकेदार व कंत्राटी कामगार यांचा विषय आहे. नगर पालिकेचा याच्याशी काही संबंध नाही. तुम्ही याची तक्रार जिल्हाधिकारी किंवा कामगार आयुक्त यांच्याकडे करा, असे बेजबाबदार वक्तव्य करून कोविड 19 मध्ये जीवावर उदार होऊन काम करणार्‍या स्वच्छता कर्मचार्‍यांचा अपमान केला आहे. त्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.

 गणेश दुबळे 

अध्यक्ष, रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशन


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!