स्थैर्य, लोणावळा, दि २२: लोणावळा शहरातील भांगरवाडी व हुडको कॉलनी परिसरात शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोड्या करीत तब्बल 6 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तर पाचव्या ठिकाणी घरफोडीचा अयशस्वी प्रयत्न झाला. एकाच रात्री एवढ्या घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांगरवाडी दामोदर कॉलनी येथील राजेश मुरलीधर काशिकर यांच्या फ्लॅटमध्ये चोरी करत चोरट्यांनी सोनसाखळी, सोन्याची अंगठी, चांदीचे दागिने असा 30 हजार रुपयांचा मुद्देमाल व 30 हजार रुपये रोख असा 60 हजारांचा ऐवज लंपास केला. दुसरी घरफोडी गोरख चौधरी यांच्या घरात झाली. त्यांच्या येथील एक सोन्याचा गंठण, सोन्याची अंगठी व दोन हजार रुपये रोख असा 34 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
तिसरी घटना हुडको कॉलनी सह्याद्रीनगर येथे घडली. यामध्ये विशाल वसंत दिघे यांच्या घरातील 2 लाख 10 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे 5 तोळ्याचे मंगळसूत्र 84 हजार रूपये किंमतीचा सोन्याचे 2 तोळ्याचा नेकलेस, सोन्याची 2 तोळ्याची साखळी, चांदीचे गणपतीचे डोक्यावरील छत्री, चांदीचा मुकूट, अन्य चांदीचे दागिने व 40 हजार रुपयांची रोकड असा 4 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
चौथी घटना संध्या प्रभाकर भोस (रा. हुडको कॉलनी, लोणावळा) यांच्याकडे घडली. त्यांच्या घरातील सोन्याचे कर्णफुले, चांदीचे दागिणे व पाच हजार रुपये रोख असा 18 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. पाचव्या घटनेत अभिजीत गजानन चिणे यांचे घराचे लॉक तोडुन चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.
लोणावळा शहरात एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या रात्रगस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस बळ निम्म्याने कमी असल्याने शहरातील रात्रगस्त तसेच वाहतूक नियोजन याकडे मागील काही काळापासून दुर्लक्ष झाले आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी या मुद्द्याकडे गांभीर्याने पहात लोणावळा शहरातील पोलीस बळ वाढवून द्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. लोणावळा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत देखील सर्व नगरसेवकांनी हा मुद्दा अधोरेखीत करत पोलीस बळ वाढवून मिळावे याकरिता शासनाकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले.