दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२१ । सातारा । ४ थी खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन हरियाणा येथे करण्यात आलेले आहे. त्या निमित्त महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघाची निवड करण्याकरिता कोल्हापूर विभागस्तरावर क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी दिनांक ०७ डिसेंबर, २०२१ रोजी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे आयोजीत करण्यात आली होती.
या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूर विभागाचे क्रीडा व युवक सेवा, उपसंचालक संजय सबनीस, यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, माजी शिक्षण सभापती सुनिल काटकर, शिवछत्रपती पुरस्कार्थी विजयराव जाधव, आंतरराष्ट्रीय खेळाडू नामदेव पाटील, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सदस्य उत्तमराव माने आदि उपस्थित होते.
या विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधूदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातील मुले व मुलींचा संघ सहभागी झाले होते. मुलांच्या वयोगटामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आण्णासाहेब डांगे कॉलेज, हातकणंगले संघाने प्रथम क्रमांक व न्यु हिंद विजय क्रीडा मंडळ, चिपळुण जि. रत्नागिरी संघाने द्वितीय क्रमांक पटकविला तसेच मुलींच्या वयोगटामध्ये प्रथम क्रमांक श्रीमती कुसुमताई राजारामबापू कन्या महाविद्यालय इस्लामपूर जि. सांगली संघाने व शंभू महादेव विद्यालय, वरकुटे-मलवडी जि. सातारा या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.