स्थैर्य, सातारा, दि. 08 : मीटर रिडींग सुरु झाल्यामुळे लॉकडाऊनच्या महिन्यांमधील अचूक वीजवापराचे व समायोजित वीजबिल जूनच्या बिलासह देण्यात आले आहे. याबाबत वीजग्राहकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम वेगाने दूर होत आहे. त्यामुळे महिन्याभरात मंगळवार (दि. 7 जुलै) पर्यंत सातारा जिल्ह्यात 2 लाख 66 हजार वीजग्राहकांनी 47 कोटी 68 लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला आहे.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महावितरणकडून मीटर रिडींग घेणे तात्पुरते बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांना एप्रिल व मे महिन्याचे सरासरी वीजबिल देण्यात आले. काही ग्राहकांकडे दि. 23 मार्चनंतर मीटर रिडींग होऊ शकले नाही. त्यांना मार्चसह एप्रिल व मे महिन्याचे बिल सरासरीने देण्यात आले आहे. त्यानंतर दि. 1 जूनपासून मीटर रिडींग सुरु करण्यात आल्यामुळे लॉकडाऊनच्या या दोन-तीन महिन्यांमध्ये वीजग्राहकांनी प्रत्यक्षात केलेल्या वीजवापराचे अचूक मीटर रिडींग उपलब्ध झाले व त्याचे समायोजित वीजबिल जूनच्या बिलासह देण्यात आले आहे.
मात्र जून महिन्यात तीन ते चार महिन्यांच्या कालावधीच्या रिडींगनुसार वीजबिल दिल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणकडून प्रत्येक कार्यालयात मदत कक्ष, वेबिनार, मेळावे, व्हॉट्स अॅप ग्रुप आदींद्वारे शंका निरसनाचे काम युद्धपातळीवर सुरु केले. यासोबतच वीजक्षेत्रातील तज्ज्ञांनी देखील वीजबिलांची आकारणी नियमानुसार व योग्य असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला. त्यामुळे वीजग्राहकांकडून वीजबिलांचा भरणा वेगाने सुरु झाला आहे. गेल्या महिन्याभरात कराड विभागात 80 हजार 300 ग्राहकांनी 13 कोटी 55 लाख, फलटण विभागात 38 हजार 300 ग्राहकांनी 7 कोटी 3 लाख, सातारा विभागात 91 हजार 200 ग्राहकांनी 18 कोटी 44 लाख, वडूज विभागात 30 हजार 850 ग्राहकांनी 4 कोटी 25 लाख आणि वाई विभागात 25 हजार 300 ग्राहकांनी 4 कोटी 41 लाख रुपयांचा वीजबिल भरणा केला आहे.
घरगुती वीजग्राहकांनी जूनमध्ये एकत्रित आलेल्या तीन ते चार महिन्यांच्या वीजबिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये. वीजबिलाच्या पडताळणीसाठी गेल्या तीन ते चार महिन्यांचा संपूर्ण हिशेब https://billcal.mahadiscom.in/consumerbill/या लिंकवर उपलब्ध आहे. एकाही पैशाचा अतिरिक्त भूर्दंड वीजग्राहकांवर जूनच्या बिलामध्ये लावण्यात आलेला नाही. ग्राहकांकडे असलेल्या मीटरचे रिडींग घेतल्यानंतर अचूक वीजवापराचे बिल तयार करण्यात आले आहे व बिलामध्ये स्लॅब बेनिफीट व स्लॅबनुसार दर आकारणी करण्यात आली आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
बारामती मंडल अंतर्गत सर्वच वीजबिल भरणा केंद्र सुरु झाले आहेत. तथापि, ग्राहकांना घरबसल्या देखील वीजबिल भरणा करण्यासाठी ‘ऑनलाईन’ची सोय उपलब्ध आहे. क्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’चे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क आहेत. तसेच ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. ग्राहकांनी विजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.