दैनिक स्थैर्य । दि. १४ सप्टेंबर २०२१ । सातारा । सातारा येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या हिरवाई येथे चोरट्यांनी डल्ला मारला जवळपास ४५ हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. चोरट्यांनी येथे नासधूसही मोठ्या प्रमाणात केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
याबाबतची अधिक माहिती अशी की, हिरवाईमध्ये काम करणारे शेख दाम्पत्य आजारी असल्यामुळे ते गेल्या दोन महिन्यांपासून येथे नाहीत. वॉचमन नसल्यामुळे येथे चार दिवसांनी स्वत: प्रा. संध्या चौगुले येवून पाहणी करतात. मात्र, शुक्रवार, दि. १0 रोजी त्या हिरवाईत गेल्या असता त्यांना वॉचमनच्या खोलीचे कुलूप तोडून तेथील साहित्य चोरीला गेले असल्याचे लक्षात आले. येथून चोरट्यांनी तीसहून अधिक खुर्ची, पाच टेबल्स, मोठ्या छत्री, मुलांची खेळणी, बक्षिसासाठी आणलेल्या वस्तूंचे बॉक्स, चटई, सतरंजी, डेकोरेशन साहित्य, अंथरुणाचे साहित्य, भांडी असा जवळपास ४0 ते ४५ हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.