स्थैर्य, सातारा, दि ९: भारतीय लष्कराने सीमेवर गोळीबार केल्याचे चीनचे वक्तव्य खोटे असल्याचे म्हटले आहे. भारताकडून गोळीबार झाल्याचे चीनने दावा केला होता. मात्र भारतीय लष्कराने हा दावा खोटा ठरवत चीनकडून गोळीबार झाल्याचे म्हटले आहे. सैन्याच्या विधानानुसार, 7 सप्टेंबर रोजी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आमच्या पुढच्या स्थानाजवळ येण्याचा प्रयत्न करत होते. भारतीय सैनिकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता चिनी सैनिकांनी गोळीबार केला. चीनने चिथावणी दिल्यानंतर भारतीय सैनिक जबाबदारीने वागत होते.
भारतीय लष्कराने असेही म्हटले आहे की आम्ही लाइन ऑफ अॅक्च्युअल (एलएसी) परिस्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्न आहे, तर चीन चिथावणीखोर कृत्य करीत आहे. आम्ही एलएसी ओलांडली नाही आणि गोळीबार किंवा तशाप्रकारचे आक्रमक कृत्य केले नाही. चीन दोन्ही देशांमधील कराराचे उल्लंघन करीत आहे. एकीकडे ते आमच्याशी लष्करी, मुत्सद्दी व राजकीय पातळीवर संवाद साधत आहेत आणि दुसरीकडे असे कृत्य करत आहेत.
दरम्या्न आम्हाला शांतता प्रस्थापित करायची आहे पण देशाचे सार्वभौमत्वाचे आणि सीमांचे कोणत्याही किंमतीत संरक्षण करू असेही सैन्याने म्हटले आहे. सैन्यानुसार, चीनच्या वेस्टर्न थिएटर कमांडने चुकीची विधाने करून आपल्या देशातील आणि उर्वरित जगाच्या लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.
काय म्हणाला होता चीन?
चिनी सैन्याच्या वेस्टर्न थिएटर कमांडच्या प्रवक्तानुसार, भारतीय सैन्याने 7 सप्टेंबर रोजी पांगोंग सोच्या दक्षिणेकडील भागावर एलएसी ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्यानेही एलएसी ओलांडल्यानंतर हवेत गोळीबार देखील केला. भारतीय सैन्याने शेनपाओ परिसरातील एलएसी ओलांडली आणि जेव्हा चिनी गस्त घालणारी पार्टी भारतीय जवानांशी बोलणी करण्यासाठी पुढे सरसावली तेव्हा त्यांनी हवेत गोळ्या झाडल्या.
1975 : अरुणाचलमध्ये हल्ला
20 ऑक्टोबर 1975 रोजी चीनने अरुणाचल प्रदेशच्या तुलुंग घुसखोरी करून भारतीय गस्त पथकावर हल्ला केला. यात 4 जवान शहीद झाले होते. त्यानंतर 45 वर्षांनी भारत-चीन सीमेवर गोळीबाराची घटना घडली.