दैनिक स्थैर्य । दि. १४ जून २०२२ । सातारा । इतर मागास प्रवर्गाच्या जागांच्या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रलंबनाचा फायदा सातारा पालिकेच्या आरक्षण सोडतीतील खुल्या गटातील उमेदवारांना झाला आहे. ओबीसी आरक्षणाच्या 11 जागांचा निर्णय न झाल्याने खुल्या प्रवर्गातील जागाची संख्या 43 झाली असून हा निर्णय माजी नगरसेवकांच्या आणि भावी मेहरबानांच्या चांगलाच पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे सातारा विकास आघाडी विरुद्ध नगर विकास आघाडी असा पारंपारिक सामना टस्सल होण्याची चिन्हे आहेत.
सातारा पालिकेच्या प्रभागांची निश्चिती झाल्यानंतर सोमवारी आरक्षणे सुद्धा जाहीर झाली. येत्या पाच जुलै पर्यंत मतदार यादी सुद्धा अंतिम होणार असून केवळ निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची औपचारिकता राज्य निवडणूक आयोगाने बाकी ठेवली आहे. ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असून त्यासंदर्भात येत्या 15 जून रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, सातारा पालिकेच्या आरक्षण सोडतीमध्ये 11 इतर मागास प्रवर्गाच्या जागा खुल्या गटात गेल्यामुळे येथील जागांची संख्या 43 वर पोहोचली असून त्यामुळे भावी मेहरबानांच्या आकांक्षांना धुमारे फुटले आहेत.
ओबीसी गटातील उमेदवार श्रीकांत आंबेकर, स्मिता घोडके, मनोज शेंडे, राजू भोसले, ज्ञानेश्वर फरांदे, लीना गोरे, अशोक मोने इत्यादी उमेदवारांना ओबीसी आरक्षणाचा निर्णय न झाल्यास खुल्या गटातून यंदाची निवडणूक लढावी लागणार आहे. सातारा विकास आघाडीचे दिग्गज किशोर शिंदे, मनोज शेंडे, वसंत लेवे, निशांत पाटील यांना त्यांच्या प्रभागांमध्ये कोणतीही अडचण नसल्याने त्यांची राजकीय बांधणी सुरू झाली आहे. काही दिग्गजांच्या प्रभाग रचनेत हद्दवाढीमुळे फरक पडला असून त्यामध्ये 30 ते 40 टक्के प्रभाग नव्या भागांना जोडला गेला आहे. उदाहरणार्थ हद्दवाढीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या टीसीपीसी भवनच्या पिछाडीला असणार्या 12 ते 14 कॉलनी व वसाहती प्रभाग क्रमांक एक मध्ये समाविष्ट झाले आहेत. तेथे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील उमेदवारांना पहिल्यांदाच निवडून द्यावा लागणार आहे. नगर विकास आघाडीचे आक्रमक चेहरा असलेले बाळासाहेब खंदारे यांच्या प्रभागात अनुसुचित महिलाही आरक्षण पडल्यामुळे त्यांना कदाचित सर्वसाधारण गटातून राजकीय नशीब आजमावावे लागेल. माजी आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांच्या वार्डात आरक्षण पडल्यामुळे सर्वसाधारण गटातून त्यांना किंवा तत्सम उमेदवाराला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. सातारा विकास आघाडीचे पश्चिम भागातील धडाडीचे नगरसेवक वसंत लेवे यांचा 23 नंबर प्रभाग हद्द वाढीमुळे दरे खुर्द ते भैरोबाचा पायथा येत पर्यंत विस्तारला असून तेथे त्यांची मोर्चेबांधणी मजबूत आहे. मात्र मंगळवार तळे परिसरातून वसंत लेवे यांनी राजकीय लढाईची तयारी सुरू केली आहे. माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना त्यांच्या प्रभागासह लगतची प्रभाग रचना सुद्धा अनुकूल असल्याने त्यांच्या विरोधात मोठा तगडा उमेदवार आमदार गटाला शोधावा लागणार आहे. प्रभाग क्रमांक सात हा शहरातील सर्वात मोठा प्रभाग असून त्याची मतदार संख्या 7900 आहे. त्यामुळे तेथील खात्रीचा उमेदवार म्हणून शेंडे यांनाच पसंती मिळणार असल्याची शक्यता आहे.
करंजे ग्रामीण ते इंदिरा वसाहत हे पहिले चार प्रभाग आरक्षित झाल्यामुळे तेथे नवे चेहरे दोन्ही आघाड्यांना द्यावे लागणार आहेत. यामध्ये करंजे ग्रामीण मधून जगन्नाथ किर्दत, लता पवार तसेच लगतच्या पिरवाडी, गोडोली, खेड परिसर, इंदिरानगर झोपडपट्टी, विलासपूर ग्रामपंचायत येथून उदयनराजे यांचे समर्थक संग्राम बर्गे व शिवेंद्रसिंहराजे समर्थक फिरोज पठाण यांनी तयारी सुरू ठेवली असल्याने येथे काट्याच्या लढती होतील असा अंदाज आहे. या भागांची निवडणूक पहिल्यांदाच होत असल्याने साधारण साडेसहा हजार लोकवस्तीच्या या प्रभागात रंगतदार लढती होतील असा अंदाज आहे. शाहूनगर परिसरात उदयनराजे समर्थक सागर भोसले यांची प्रभाग 15 साठी मजबूत बांधणी सुरू आहे. येथे सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण ही आरक्षणे भोसले यांना अनुकुल ठरली आहेत. पश्चिम भागामध्ये वॉर्ड क्रमांक 24 हा नव्याने बोगद्याचा डोंगरी भाग धस कॉलनी थेट मंगळवार तळे कॉर्नर असा उभ्या पद्धतीने तयार झाल्याने येथे सचिन सारस रवींद्र ढोणे इच्छुक आहेत. ढोणे यांनी जोरदार तयारी ठेवल्याने त्यांचेच पारडे जड असल्याची चिन्हे आहेत. त्यांच्या समोर सातारा विकास आघाडीचे तत्सम उमेदवार कोण दिले जातील याच्यावर राजकीय लढाई अवलंबून आहे. करंजे ग्रामीण साठी सातारा विकास आघाडीने यांच्या माध्यमातून मजबूत दावेदारी सांगायला सुरुवात केली आहे.
शाहूपुरी भागासाठी आमदार आणि खासदार गटात पारंपारिक लढत पाहायला मिळेल. खासदार समर्थक संजय पाटील यांची तयारीत सुरू आहेच. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा या भागातून तुल्यबळ उमेदवार शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. हा शोध पूर्णत्वाला गेल्याची माहिती असली तरी ते नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. यंदा तब्बल 21 महिला उमेदवारांना खुल्या गटातून संधी मिळणार आहे. त्यामुळे महिला नेतृत्व हे तडफदार आणि सक्षम अभ्यासू असावे अशा अपेक्षेने आघाड्यांना नवा उमेदवार शोधण्याची कसरत करावी लागेल. मागास प्रवर्गाच्या सात प्रभागांमध्ये नवे चेहरे शोधण्याची वेळ पक्षप्रतोदांवर येणार आहे.
सदर बाजार मध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये आरक्षण पडल्यामुळे सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद निशांत पाटील यांना त्याच प्रभागातून सर्वसाधारण गट किंवा लगतच्या प्रभागातून लढण्याची पुर्णतः संधी आहे. मात्र ओबीसी आरक्षणाचा जर येत्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात निर्णय झाला तर खुल्या जागांमधील 11 जागा ओबीसी प्रवर्गासाठी हस्तांतरित करणारी सोडत पुन्हा काढावी लागेल. यामध्ये सहा पुरुष पाच महिला अशी संख्या राहिल्यास 32 जागा खुल्या गटाच्या अकरा जागा इतर मागास प्रवर्गाच्या आणि सात जागा या मागास प्रवर्गाच्या असतील. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाचे जिल्हा प्रकल्प संचालक अभिजित बापट यांनी पुढील आदेश येईपर्यंत यासंदर्भात भाष्य करणे उचित होणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.