दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑक्टोबर २०२१ | सातारा | नागठाणे (ता.सातारा येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री रामकृष्ण विद्यामंदिर व ज्यू.कॉलेज येथे अज्ञात चोरट्याने कार्यालयाचा कडी-कोयंडा उचकटून सुमारे ४२ हजार रुपयांची रोकड लंपास केली. शनिवारी पहाटे ही चोरी झाली. विद्यालयात रात्र पाळीला असलेला शिपाई झोपल्याने चोरट्याने डाव साधला.
याबाबत बोरगाव पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री शाळेचा शिपाई सुरेंद्र मधुकर कोळी याची रात्रपाळीची ड्युटी होती.रात्री जेवण करून ते शाळेत रात्रपाळीसाठी कामावर आले. रात्री ११.३०च्या सुमारास सुरेंद्र कोळी मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये झोपी गेले.
पहाटे १.४५ च्या सुमारास शेजारील खोलीच्या कडीचा आवाज आल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता तोंडाला कापड बांधलेला एक इसम शाळेच्या प्रांगणातून जाताना दिसला.त्याला हटकले असता त्याने ‘ पुढे आलास तर मारून टाकीन’ अशी धमकी देत तेथून पलायन केले.यावेळी शिपाई कोळी यांना कार्यालयाच्या व उपमुख्याध्यापक केबिनच्या दरवाजाचे कडी-कोयंडे उचकटलेले आढळले.याची माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली.अज्ञात चोरट्याने कार्यालयातील पाच लोखंडी कपाटेही कटावनिणे उचकटले होते.त्यापैकी एका कपाटात असलेली ४२ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेण्यात चोरटा यशस्वी झाला.
घटनास्थळी बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ.सागर वाघ व पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.अज्ञात चोरटा सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहेत.या चोरीची फिर्याद शिपाई सुरेंद्र मधुकर कोळी यांनी दिली असुन पुढील तपास सहायक फौजदार रामचंद्र फरांदे करत आहेत.