दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी मुंबई-ठाणे क्षेत्रातील ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीकरिता प्रतिसदस्य पाच किलो मोफत अन्नधान्य वितरित करण्यात येणार आहे. यासाठी प्रतिमाह 16 हजार 385 मेट्रीक टन गहू, 24 हजार 753 मेट्रीक टन तांदूळ असे एकूण 41 हजार 138 मेट्रीक टन धान्य वितरित करण्यासाठी नियतन मंजूर करण्यात आले असल्याची माहिती नियंत्रण शिधावाटप व संचालक नागरीपुरवठा यांनी दिली आहे.
गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मोफत अन्नधान्य वितरणाचे परिणाम, प्राधान्य कुटुंबाकरिता प्रतिमाह प्रति लाभार्थी 3 किलो तांदूळ व 2 किलो गहू तसेच, अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांकरिता प्रतिमाह प्रति लाभार्थी 4 किलो तांदूळ व 1 किलो असे वितरणासाठी प्राप्त झाले आहेत.
योजनेतील लाभार्थींचे शासनाकडून प्राप्त ड, ई व ग परिमंडळ कार्यालयांचे तांदूळ व गव्हाचे नियतन हे सप्टेंबरकरिता अहवालानुसार विक्रीपेक्षा कमी असल्याने संबंधित परिमंडळ कार्यालयांना शासनाकडून प्राप्त नियतनाच्या मर्यादेत नियतन मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित परिमंडळ कार्यालयांना सप्टेंबर करिता अहवालानुसार विक्रीच्या 100 टक्के प्रमाणे नियतन मंजूर करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.