मागील वर्षाचे ४०० रूपये द्या अन्यथा तालुक्यातील कारखान्यांची ऊस वाहतूक बंद करणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा


दैनिक स्थैर्य | दि. १३ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
मागील वर्षी गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रती टन ४०० रूपये शेतकर्‍यांना व चालू वर्षी उसाला प्रती टन ३५०० रूपये दर द्या, अन्यथा फलटण तालुयातील साखर कारखान्यांची ऊस वाहतूक बंद करणार असल्याचा इशारा फलटण तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

फलटण तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज श्री दत्त इंडिया, स्वराज, शरयू व श्रीराम जवाहर या कारखान्यांच्या प्रतिनिधींना शांततेच्या मार्गाने खर्डा भाकरी भेट देण्यात आली. त्यावेळी वरील इशारा देण्यात आला.

यावेळी सर्व कारखान्यांना निवेदन देण्यात आले की, संपूर्ण महाराष्ट्रात मा. खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात ऊस दर आंदोलन सुरू आहे. दि. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या राजव्यापी ऊस परिषदेमधील मागणीनुसार गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रती टन ४०० रुपये शेतकर्‍यांना मिळावा व चालू वर्षी गाळप होणार्‍या ऊसाचा प्रती टन ३५०० रुपये एकरकमी ऊस दर ऊस उत्पादकांना मिळावा. जर शेतकर्‍यांच्या ऊस दराची मागणी पूर्ण झाली नाही तर आपल्या कारखान्यांची ऊस वाहतूक बंद करणार असून येणार्‍या परिणामांना सामोरे जा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी म्हटले आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, जिल्हा सरचिटणीस डॉ.रवींद्र घाडगे, तालुकाध्यक्ष नितीन यादव, पक्ष तालुकाध्यक्ष दादा जाधव, शहराध्यक्ष सचिन खानविलकर, किरण भोसले, बाळासाहेब शिपकुले, प्रल्हाद अहिवळे, धनंजय जाधव हवालदार, अजित भोसले, केतन जाडकर, सागर जावळे यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!