स्थैर्य, सातारा, दि. 10 : फलटण तालुक्यातील निरा उजवा कालव्याचा पाटकरी 2015 मध्ये लाच घेताना रंगेहाथ सापडला होता. त्याची सुनावणी होवून विशेष जिल्हा न्यायालयाने त्यास चार वर्षे सक्तमजुरी शिक्षा सुनावली आहे.
याबाबत माहिती अशी, रमेश आप्पासो पवार वय 60 वर्षे हा पाटबंधारे खात्यात निरा उजवा कालवाअंतर्गत फलटण तालुक्यात पाटकरी म्हणून कार्यरत होता. मुंंजवडी येथील संबंधित तक्रारदाराच्या उसात पाणी सोडण्यासाठी त्याने 2 हजारांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने अँटिकरप्शन ब्युरोकडे तक्रार दिल्यानंतर दि. 20 मे 2015 रोजी सापळा लावून पाटकरी रमेश पवारला 2 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.
या खटल्याचा तपास तत्कालिन पोलिस अधीक्षक तत्कालिन पोलिस निरीक्षक वैशाली पाटील (ला.प्र.वि. सातारा) यांनी करून दि. 29 मे 2015 रोजी विशेष न्यायालय सातारा येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी एन. एल. मोरे, विशेष न्यायाधीश, सातारा यांच्यासमोर होवून रमेश पवार यास ला.प्र.का.कलम 7 अन्वये – 3 वर्ष सक्तमजुरी व दोन हजार दंड, तसेच कलम 13 (1) (ड) सह 13 (2) अन्वये – 4 वर्षे सक्त मजुरी व दोन हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे सौ.मंजुषा तळवलकर यांनी युक्तीवाद केला.