
फलटण येथे आयोजित ३७ व्या ‘साहित्यिक संवाद’मध्ये ‘दांभिकतेचा उन्माद’ या विषयावर सखोल विचारमंथन करण्यात आले. यावेळी डॉ. सुधीर इंगळे, ताराचंद्र आवळे आणि प्रा. श्रेयस कांबळे यांनी समाजातील वाढती बुवाबाजी आणि अंधश्रद्धेवर कडाडून प्रहार केले.
स्थैर्य, फलटण, दि. २ एप्रिल : एकीकडे अंधश्रद्धेच्या दरबारात राजकीय नेते एका दहावी पास भोंदूबाबाचे पाय धुवू लागले आहेत, तर दुसरीकडे श्रद्धेच्या प्रांगणात (ज्योतिबाच्या डोंगरावर) चक्क मंदिरातच भक्ताला लाथा-बुक्क्यांनी तुडवण्यात पुजारी रमले आहेत. मंत्रोच्चाराची वाणी शिव्यांची लाखोली वाहू लागली आहे. या वाढत्या दांभिक उन्मादाबद्दल ‘लोकमत’ (कोल्हापूर) चे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांनी आपल्या लेखणीतून परखड वास्तव मांडले होते. याच ‘दांभिकतेचा उन्माद’ या ज्वलंत विषयावर फलटण येथील ३७ व्या ‘साहित्यिक संवाद’मध्ये सखोल विचारमंथन करण्यात आले.
शिक्षित आणि आर्थिक सक्षम घटकांवर ताशेरे:
यावेळी बोलताना अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते व ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुधीर इंगळे यांनी खरातसारख्या भोंदू प्रवृत्तींना खतपाणी घालणाऱ्या शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या घटकांवर कडाडून ताशेरे ओढले. ते म्हणाले, “या सर्व प्रकाराला आपली दांभिक मानसिकता जबाबदार आहे. ‘लोकमत’मधील लेखाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, आपल्या आसपासही अशा प्रवृत्ती उन्माद करत आहेत, याला वेळीच रोखण्यासाठी आपण प्रथम आपल्या मानसिकतेत बदल करायला हवा.”
बुवाबाजीवर साहित्यिकांनी प्रहार करण्याची गरज:
माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी लेखकांच्या अस्वस्थ मनाचा हुंकार यावेळी व्यक्त केला. “आज संपूर्ण जग युद्धाच्या छायेमुळे अस्वस्थ आणि अशांत असताना, आपण मात्र खरातसारख्या प्रवृत्तींना खतपाणी घालत आहोत. समाजात बुवाबाजी मोठ्या प्रमाणात फोफावली असून, साहित्यिकांनी यावर आपल्या परखड लेखणीतून वास्तव मांडले पाहिजे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सामाजिक स्वास्थ्य टिकवणे महत्त्वाचे:
प्रा. श्रेयस कांबळे यांनी ‘दांभिकतेचा उन्माद’ या लेखाचा संदर्भ देत नेक ठिकाणी सुरू असलेल्या या प्रकारांवर चिंता व्यक्त केली. “समाजाचे स्वास्थ्य टिकवणे अत्यंत महत्त्वाचे असून, असा दांभिक उन्माद करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. तसेच, साहित्यिकांनीही आपल्या लेखणीने या उन्माद करणाऱ्यांना फटकारले पाहिजे,” असे मत प्रा. कांबळे यांनी मांडले.
‘तरडगावचा आप्पा’ कथेचे सादरीकरण:
या विचारमंथनादरम्यान आप्पा तांबे यांनी ग्रामीण भागातील बुवाबाजीवर आधारित ‘तरडगावचा आप्पा’ या कथेचे अत्यंत प्रभावी कथाकथन सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
या साहित्यिक संवादासाठी माधुरी जगदाळे, सविता तांबे, प्रमोद सस्ते, आप्पासाहेब तांबे, प्रा. विकास शिंदे, राजाभाऊ काकडे, सचिन जाधव, महादेव गायकवाड, योगेश जगदाळे, अनिल सोनवलकर यांच्यासह परिसरातील अनेक साहित्यिक आणि रसिक वाचक उपस्थित होते.

