350 वर्षाची पांडे गावचे अनोखे ’उभ्याचे नवरात्र’


स्थैर्य, सातारा, दि. 27 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कारवाई तालुक्यातील पांडे गावाने आपले एक खास व्रतपरंपरेनुसार कायम जपले आहे. ’उभ्याचे नवरात्र’ असे हे व्रत सुमारे साडेतीनशे वर्षापासून अखंडितपणे सुरू असून, ज्या भक्तानी ग्रामदैवत काळभैरवनाथाला नवस बोलले आहेत, ते नऊ दिवस सलग उभे राहून आपला नवस पूर्ण करतात.

घटस्थापनेपासून सुरू होणारे हे खडतर व्रत थेट विजयादशमीला (दसरा) उपवास सोडल्यानंतर पूर्ण होते. ’मनी धरावे ते होते, अशी या व्रताची महती गावकरी सांगतात. पुणे- बंगळूर महामार्गापासून जवळ असलेल्या पांडे गावात नऊ दिवस मोठा धार्मिक उत्साह असतो. नऊ दिवसांच्या या व्रतामध्ये नवसकर्‍यांसाठी अत्यंत कडक नियम पाळणे बंधनकारक असते.

नवरात्रात गावातील जवळपास 75टक्के लोक कडक उपवास पाळतात. शुद्ध प्रतिपदेला पहाटे अंघोळ करून सर्व ग्रामस्थ एकत्र येतात. भैरवनाथाच्या पालखीसोबत सलग नऊ दिक्स गावाला प्रदक्षिणा घालण्यात येते. धुपारतीनंतर घटस्थापना होते आणि सर्व देवदेवतांची छबिना व पालखी मिरवणूक काढली जाते. दररोज ढोल ताशे, शिंगे आणि तुतारीच्या निनादात नवसकरी व महिला भैरवनाथाच्या मंदिरात येतात आणि व्रतास सुरुवात होते. फराळात फळे आणि तिखट-मीठ एकत्र नसलेल्या साध्या पदार्थांचा समावेश असतो. रात्रीच्या वेळी भजन, कीर्तन, गोंधळ, वाघ्या-मुरळी यांसारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात.

विजयादशमीला सीमोल्लंघन आणि अष्टमीच्या दिवशी रात्री देवाचा मोठा जागर होतो. यावेळी पेढे वाटण्याची पद्धत आहे. नवमीच्या दिवशी कौल लावून पुढील नवस बोलले जातात. उत्सवाचा समारोप विजयादशमीला होतो. या दिवशी देवापुढे कौल लावून सीमोल्लंघनाची दिशा ठरविली जाते. त्यानंतर त्या दिशेकडील गावाच्या हद्दीवर जाऊन भाविक ’सोने लुटतात’ (आपट्याची पाने वाटतात). गावातील सर्व जातीधर्माचे लोक, आबालवृद्ध आणि बाहेरगावचे पाहुणे मोठ्या उत्साहाने या उत्सवात सहभागी होतात.

मी गेली अनेक वर्षे उभ्याचे नवरात्र करीत आहे. मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होऊन देवी कुटुंबावर छत्रछाया धरते, असा माझा अनुभव आहे.
– राजेंद्र जाधव, नवसकरी

पांडे गावची ही ’उभ्याची नवरात्र’ परंपरा केवळ धार्मिक निष्ठा नाही, तर मराठी संस्कृतीतील एका मोठ्या सामूहिक शिस्त आणि श्रद्धेचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
– किरण जाधव, माजी सरपंच, पांडे.


Back to top button
Don`t copy text!