वाई सुधारित पाणी पुरवठा योजनेसाठी ३५ कोटी – उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२१ । वाई । वाई शहरासाठी सुधारित पाणी पुरवठा योजनेसाठी प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल,असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केले.

वाई येथे आयोजित विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जि. प.अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, मकरंद पाटील,  नगराध्यक्ष अनिल सावंत, जि.प. उपाध्यक्ष प्रदीप विधाते आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, वाई शहराचा विस्तार लक्षात घेता आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी शासनाकडून सहकार्य करण्यात येईल. वाई, महाबळेश्वर, खंडाळा, लोणंद, पाचगणीतील विविध सुविधासाठी १० कोटी रुपये देण्यात येतील. वाई शहरातील भूमिगत गटार योजनेबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल. कृष्णा घाट विकास आणि नदी सुधार योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत सुरुर-पोलादपूर राज्य महामार्गाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून समावे करण्याबाबत विनंती करण्यात येईल.

ते म्हणाले, शहरांचा विकास करताना ती स्वछ आणि नीटनेटकी असायला हवी. शहरातील सांडपाणी व्यवस्थापन चांगल्यारितीने होणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आग्रही भूमिका घ्यावी. नव्याने उभारण्यात येणाऱ्या शाळेच्या इमारतीमधून दर्जेदार शिक्षण देण्यात यावे. पुलाचे काम देखणे आणि दर्जेदार  व्हावे. भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन डिसेंबर पर्यंत चार पदरी पुलाचा प्रस्ताव सादर करावा, येत्या अंदाजपत्रकात त्यासाठी मान्यता देण्यात येईल, असे श्री.पवार म्हणाले.

नगर परिषदेचे व्यापारी संकुल शहराच्या वैभवात भर घालणारे आणि नागरिकांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध जर  देणारे ठरावे असेही त्यांनी सांगितले.

कोविड योद्ध्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना उपमुख्यमंत्री म्हणाले, मानव जातीवर कोविडचे संकट आले असताना नागरिकांचा जीव वाचविण्याला या योद्ध्यांनी प्राधान्य दिले. त्यांनी खऱ्या अर्थाने मानवसेवेचे कार्य केले. आमदार मकरंद पाटील यांच्यासारख्यांचा सन्मान केल्याने  काम करणाऱ्याला प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले. वाई परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यास कुठलीही कमतरता भासू देणार नाही असेही श्री.पवार म्हणाले.

श्री.रामराजे नाईक निंबाळकर यांनी आमदार मकरंद पाटील यांनी कोरोना काळात सेवा भावनेने कार्य केले असे सांगितले. कृष्णा नदीवरील पुलामुळे वाईसाठी चांगली सुविधा होईल. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणावर भर देणे अवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, बाहेरील जिल्ह्यातील नागरिक वाई येथे येतात. ही सांस्कृतिक नगरी असल्याने पुलाचे बांधकाम करताना त्याचे जुने सौंदर्य कायम ठेवण्यात येत आहे. मुलांसाठी शाळेच्या चांगल्या इमारती उभ्या राहणार आहेत. कोविड काळात आरोग्य सुविधांना प्राधान्य देण्यात आल्याने विकासासाठी निधीची कमतरता भासत होती. मात्र आता जिल्हा नियोजन समिती आणि शासनाच्या माध्यमातून विकासाला वेग देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार मकरंद पाटील यांच्या कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.


Back to top button
Don`t copy text!