दैनिक स्थैर्य । दि. ०३ नोव्हेंबर २०२२ । फलटण । ३२ व्या राष्ट्रीय किशोर-किशोरी अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने घडसोली मैदानावरील आमदार श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक-निंबाळकर क्रीडा संकुलात आज पुन्हा एकदा इतिहास रचला. लागोपाठ दोन वर्षात महाराष्ट्राने दुहेरी मुकुट मिळवला आहे. गेल्या वर्षी उना, हिमाचल प्रदेश येथील इंदिरा गांधी स्टेडीयमवर सुध्दा इतिहास रचत महाराष्ट्राने सहव्यांदा दुहेरी मुकुट मिळवला होता. आज त्या आठवणी या १४ वर्षाखालील किशोर-किशोरींनी ताज्या केल्या. गतवर्षी महाराष्ट्राच्या किशोरांनी कर्नाटकवर तर किशोरींनी पंजाबवर विजय मिळवला होता. आज ३२ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेची सांगता झाली. महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी दोन्ही संघानी डावाने विजय मिळविण्याची घोडदौड कायम राखत किशोर-किशोरी गटाच्या ३२व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद कायम राखले. कर्णधार राज जाधव व धनश्री कंक हे सर्वोत्कृष्ट भरत व इला पुरस्काराचे मानकरी ठरले. या स्पर्धेच्या अंतीम फेरीत महाराष्ट्राच्या किशोरांनी व किशोरींनी कर्नाटकवर विजय मिळवत दुहेरी मुकुटासह अजिंक्यपद मिळवले. किशोर गटाने आतापर्यंत ११ वेळा तर किशोरीने गटाने १६ वेळा विजेतेपद पटकाविली आहेत. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा भरत पुरस्कार राज जाधवला तर ईला पुरस्कार धनश्री कंक ला देऊन गौरवण्यात आले.
आजच्या अंतीम फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या किशोर संघाने कर्नाटकवर १३-०७ असा एक डाव ६ गुणांनी विजय मिळवत कर्नाटकचा धुव्वा उडवला. या स्पर्धेतील सर्व सामने डावाने जिंकले होते. या सामन्यात महाराष्ट्राने सुरवातीपासूनच कर्नाटकला डोक वर काढण्याची जराही संधी दिली नाही. प्रकशिक्षक प्रफुल्ल हाटवटे यांचा या विजयात सिंहाचा वाटा आहे. खेळाडूंची गुणवत्ता हेरून त्यांना संधी दिली व त्या खेळाडूंनी सुध्दा संधीचे सोने केल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या पहिल्या तुकडीतीलच कर्णधार राज जाधव १.४०, आशिष गौतम २.२५, हाराद्या वसावे २.५० मिनिटे संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली. आक्रमणात आशिष व हाराद्या यांनी प्रत्येकी ३ गडी टिपले. दुसऱ्या संरक्षणात राजने २.३० व जितेंद्र वसावे याने २.०० मिनिटे पळती केली. कर्नाटक कडून कुमार याने १.१० व २ गुण तर चेतन याने ५० सेकंद पळती करीत २ गुण मिळविला.
महाराष्ट्राच्या किशोरींनी अंतीम फेरीच्या सामन्यात कर्नाटकवर ९-०५ असा एक डाव ४ गुणांनी धूळ चारली. या स्पर्धेतील सर्व सामने डावाने जिंकले होते. त्यात प्रकशिक्षक अमित परब यांचा मोठा वाटा आहे. खेळाडुंमध्ये समन्वय घडवणे व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांच्याकडून अप्रतिम कामगिरी घडवून घेणे हे काम अमित परब यांनी अतिशय उत्कृष्ट पणे पार पाडले. प्रथम संरक्षण करताना महाराष्ट्राच्या पहिल्या तुकडीतील संरक्षकानी भक्कम बाजू सांभाळली. कर्णधार धनश्री कंक २.३० व विद्या तामखडे नाबाद ३.०० मिनिटे पळती केली. पहिल्या डावात महाराष्ट्राचे २ गडी बाद झाले. महाराष्ट्राने आपल्या पहिल्या आक्रमणात ९ गडी टिपले. यात धनश्री, विद्या व प्राजक्ता बनसोडे यांनी प्रत्येकी २ गडी टिपले. तर दुसर्या संरक्षणात धनश्री कंकने २.५० व विद्या तामखडेने ३.५० मिनिटे पळती केली व मोठा विजय साजरा केला. तर कर्नाटककडून हर्शिता (१.५० मिनिटे व २ गुण) व सुस्मिता (१.३० मिनिटे व १गुण) यांनी अष्टपैलू खेळी करीत लढत दिली.
भारतीय खो खो महासंघाचे सह सचिव डॉ. चंद्रजीत जाधव व महाराष्ट्र खो खो असो.चे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, सचिव अॅड. गोविंद शर्मा यांनी महाराष्ट्राने सलग दुसर्यांदा मिळवलेल्या दुहेरी मुकूटाबद्दल व विजयाबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापक यांचे अभिनंदन केल आहे. तर आज मिळवलेल्या घवघवीत यशानंतर किशोरांचे प्रशिक्षक प्रफुल्ल हाटवटे व किशोरींचे प्रशिक्षक अमित परब यांनी घेतलेल्या मेहनतीचे चीझ झाल्याचे सांगितले. जिंकण्याचा विश्वास होता तो मुलांनी खरा ठरवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.