स्थैर्य,सातारा दि.18: शासनाने घालून दिलेल्या वाहतुकीचे नियम पाळले तर मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकतात. नियम पाळणे आपल्याबरोबर दुसऱ्याच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्वाचे असून अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
32 व्या रस्ता सुरक्षा अभियानांचे उद्घाटन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
वाहतुकीचे नियम पाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून ते प्रत्येकाने पाळले पाहिजेत, असे सांगून जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले, वेगाने वाहने चालविण्याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे. हे तुमच्यासाठी व इतरांसाठी धोक्याचे असून नियमांचे पालन करुनच वाहन चालविले पाहिजे. अवजड वाहन चालविणाऱ्यांच्या आरोग्य तपासणीमध्ये डोळ्यांचीही तपासणी करावी, ज्यांना चष्मा लागला असेल अशांना चष्मे वाटप करावेत यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने पुढाकर घ्यावा. सर्वांनी जर नियम पाळून वाहने चालविली तर निश्चितपणे अपघाताचे प्रमाण कमी होईल, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.