३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑक्टोबर २०२२ । फलटण । भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने सातारा जिल्हा ॲमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या अधिपत्याखाली ३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा येथील घडसोली मैदानावरील आमदार श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक-निंबाळकर क्रीडा संकुलात सुरू झाली असून ही स्पर्धा दोन नोव्हेंबरपर्यंत चालेल. आज झालेल्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांनीही विजयी सलामी दिली तर विदर्भच्या मुलींचीही विजयी घोडदौड सुरू आहे.

आज झालेल्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांनी झारखंडवर १८-९ असा एक डाव राखून ९ गुणांनी शानदार विजय मिळविला. महाराष्ट्राच्या जितेंद्र वसावे याने आपल्या धारदार आक्रमणात ६ गडी टिपत विजयाची मुहुर्तमेढ रोवली. त्यावर कळस चढवताना संग्राम डोंबाळेने ३:४० मि. संरक्षण करत प्रेक्षकांना मैदानवर जणू भुरळच घातली होती. हाराद्या वसावे व सोत्या वळवी यांनी प्रत्येकी २.१० मि. संरक्षण करत मोठा विजय सुनिश्चित केला. गतविजेत्या महाराष्ट्राचे प्रशिक्षक प्रफुल्ल हाटवटे यांनी सुरवातीपासूनच आपले डावपेच आक्रमक ठेवत आपले पुन्हा विजेतेपदाचे इरादे दाखवून दिले. तर झारखंडकडून संजय हेंब्राम याने ३ गडी बाद करीत एखाती व कडवी झुंज दिली ती वाखणण्याजोगी होती हेच त्याच्या खेळातून दिसले.

विदर्भच्या मुलांपाठोपाठ मुलींनीही आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. त्यांनी मध्यप्रदेशवर १७-१२ असे एक डाव ५ गुणांनी मात केली. मोनिकाची अष्टपैलू खेळी त्यांच्या संघास सहज विजय मिळवून देणारी ठरली. मोनिकाने तीन मिनिटे संरक्षण करत आक्रमणात २ गुण मिळवले.

अन्य एका चुरशीच्या सामन्यात ओरिसाने झारखंडवर १५-१४ (मध्यंतर ९-५) असे एक मिनिटे राखून निसटती मात केली. मध्यंतरी घेतलेली आघाडीच त्यांना विजय मिळवून देऊन गेली.

अन्य निकाल : मुले: पाँडिचेरी विजयी वि तामिळनाडू ९-७; कर्नाटक विजयी वि. दादरा नगर हवेली १७-५ डावाने, दिल्ली विजयी वि. बिहार १२-५ डावाने, छत्तीसगड विजयी वि. जम्मू काश्मीर २२-३ डावाने, उत्तराखंड विजयी वि. मध्यप्रदेश १०-९ डावाने.

मुली: पश्चिम बंगाल विजयी वि. ओरिसा २१-१६, पाँडिचेरी विजयी वि. हिमाचल प्रदेश १३-९, राजस्थान विजयी वि. जम्मू काश्मीर १७-१ डावाने, पाँडिचेरी विजयी वि. तेलंगणा १२-७ डावाने.


Back to top button
Don`t copy text!