स्थैर्य, सातारा, दि.९ : अतिवृष्टीनंतर सातारा जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणी वेगाने सुरू झाली आहे. आतापर्यंत ६७ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ज्वारीची पेरणी ४३ तर जिल्ह्यातील एकूण पेरणीची टक्केवारी ३१ झाली आहे. दरम्यान अद्याप काही भागात वापसा नसल्याने यंदा गहू अन् हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होईल अशी माहिती कृषी विभागातून देण्यात आली.
सातारा जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र दाेन लाख १९ हजार ११९ आहे. यामध्ये सर्वाधिक ज्वारीचे १ लाख ३९ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. गहू ३४ हजार ९७३, मका १२ हजार १७७ तर हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार ४८९ हेक्टर आहे. तर करडई, सूर्यफूल, तीळ, जवस यांचे क्षेत्र अत्यल्प आहे.
ऑक्टोबर महिना सुरू झाल्यापासून काही तालुक्यांत रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीस सुरुवात झाली होती. पण, त्यानंतर सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पेरणी थांबावी लागली. काही ठिकाणी ज्वारी पिकाचे नुकसान झाले. सध्या जिल्ह्यातील पेरणी ३०.४८ टक्के झाली आहे. तर ६६ हजार ७९२ हेक्टरवर पेरा पूर्ण झाला आहे. ज्वारीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र माण तालुक्यात ३२ हजार ५४५ हेक्टर असून, त्यानंतर फलटणला २१ हजार ५६४ आणि खटावला २० हजार ८५५ हेक्टर आहे. तसेच कोरेगाव, खंडाळा, वाई, कऱ्हाड, सातारा, जावळी या तालुक्यांतही ज्वारीचे क्षेत्र आहे. ज्वारीची आतापर्यंत ५९ हजार ६७४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाची आतापर्यंत १.५३ टक्के, मका ३०.०३ आणि हरभऱ्याची ९.३९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
सातारा जिल्ह्यात रब्बीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र हे माण तालुक्यात ३९ हजार ८१६ हेक्टर आहे. त्यानंतर फलटणला ३३ हजार, खटाव ३० हजार ११६, कोरेगाव २३ हजार ३३७, सातारा २० हजार ९४९, खंडाळा १८ हजार १७५, कºहाड १५ हजार ४८७, वाई तालुका १५ हजार १५८, पाटण १३ हजार, जावळी ९ हजार ३०७ आणि महाबळेश्वर तालुक्यात ६९८ हेक्टर आहे. आतापर्यंत सर्वाधिक पेरणी खटाव तालुक्यात ५०.८४ टक्के झाली आहे. त्यानंतर माणमध्ये ४२ टक्के झाली आहे. तर फलटण ३३, सातारा तालुका ३२, वाई ३०.५४, कऱ्हाड तालुक्यात २१.७२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर इतर तालुक्यात पेरणीचे प्रमाण कमी आहे.