स्थैर्य, औंध, दि. 27 : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन जीवापाड मेहनत घेऊन लढा देत आहे, अशा या वैश्विक महामारीच्या लढाईत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व कोरोना योध्यांचे मनोबल वाढविण्यासाठी खटाव तालुक्यातील गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्सकडून खटाव-माण तालुक्यातील कोरोना योध्यांसाठी सुमारे ३०० पीपीई किट देण्यात आली. ग्रीन पॉवर शुगर्सचे मुख्य प्रवर्तक संग्रामसिंह देशमुख यांच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी आश्विनी जिरंगे यांच्याकडे पीपीई किट, मास्क,हॅण्डग्लोज देण्यात आले. यावेळी असिस्टंट जनरल मॅनेजर स्वरूप देशमुख, आँफिसर आँनस्पेशल ड्युटी विजय जगताप, चिफ इंजिनिअर शहाजी भोसले, लेबर आँफिसर विनायक यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोनाच्या या लढ्यात ग्रीन पॉवर शुगर्सने केलेली मदत ही कौतुकास्पद असून खटाव व माण तालुक्यासाठी ३०० कीटचे वाटप करून एक वेगळा आदर्श घालून दिला असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी जिरंगे यांनी केले.