स्थैर्य,भिलवाडा, दि.१७: कोरोनाकाळापासून चार महिने व्यवसाय बंद राहिल्याने माेठी पेंटअप मागणी आणि चीनच्या आयातीत घट आल्याने धागा आणि कपड्याची मागणी आणि पुरवठ्यात फरक आला आहे. यामुळे धाग्यांच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. धागा महाग झाल्याने कापडही १० रुपयांवरून ३५ रुपये प्रतिमीटरपर्यंत महाग झाले आहे. व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, कापड महाग झाल्याने उन्हाळ्यात कपड्यांचे भाव दहा पटीपर्यंत वाढू शकतात. भिलवाड्याच्या सिंथेटिक वीव्हिंग मिल्स असोसिएशनचे उपाध्यक्ष रमेश अग्रवाल यांनी दैनिक भास्करला सांगितले की, पॉलिएस्टर व टेक्श्चराइज सूटिंग गेल्या फेब्रुवारीच्या तुलनेत आता सुमारे १० रु. प्रतिमीटर महाग झाले आहे. सुती कपडा २५ ते ३० रु. प्रतिमीटर आणि डेनिम कपडा प्रतिमीटर ३० ते ३५ रु. महाग झाला आहे. ही तेजी जूनपर्यंत अशीच चालेल. भिलवाडा कापड बाजारात प्रथमच एका वर्षात सुताच्या भावात एवढी तेजी आली, ज्यामुळे कपडाही महाग झाला आहे.
हिवाळ्यातील कपड्यांच्या हंगामात कोरोनामुळे नुकसान सोसणाऱ्या लुधियानाच्या होजियरी आणि गारमेंट उद्योगाला उन्हाळ्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, धागे आणि कपड्यांच्या वाढलेल्या किमतींमुळे लुधियानाच्या कापड उद्योगाच्या चिंता वाढल्या आहेत. अॅपरल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ लुधियानाचे अध्यक्ष सुदर्शन जैन म्हणाले, लुधियानाचा होजियरी उद्योग उन्हाळ्यातील कपड्यांचा ५००० कोटीचा व्यापार करतो. टी शर्टपासून स्पोर्ट्स विअरमध्ये वापर होणाऱ्या लाइक्राची किंमत नोव्हेंबरमध्ये ४०० रु. प्रतिकिलो होती, जी ८०० रु. प्रतिकिलो झाली. कॉटन, पॉलिएस्टर व उर्वरित सुताच्या किमतीही ३५ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत महाग झाल्या. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने ३०० कोटींहून जास्तीचा बोजा उद्योगावर पडू शकतो.
मागणी खूप चांगली आहे. मात्र, कच्चा माल खूप महाग झाला आहे. उत्पादनांच्या किमती ६ ते १० % पर्यंत वाढवत आहोत. किमतीचा बोजा स्वत: उचलत आहोत. – कुंतल जैन, ड्यूक फॅशन्स