दैनिक स्थैर्य । दि. २० जून २०२२ । शिरवळ । पुण्याकडे भरधाव वेगाने निघालेल्या आयशर टॅम्पोने वारकर्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात 30 वारकरी जखमी झाले असून एका वारकर्याचा मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटे येथील वारकरी ट्रॅक्टर ट्रॉलीतून आळंदीला वारीसाठी निघाले होते. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये सुमारे 43 वारकरी होते. दरम्यान, पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पो पुण्याकडे भरधाव वेगाने जात असताना चालकाचा शिरवळजवळ गाडीवरील ताबा सुटला आणि टेम्पोने विद्युत पोलला धडक दिली. त्यानंतर ट्रॉलीमधून आळंदीकडे निघालेल्या वारकर्यांच्या ट्रॉलीला या टेम्पोने धडक दिली.
या धडकेमध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसलेले वारकरी थेट रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात 30 वारकरी जखमी झाले असून एका वारकर्याचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर शिरवळ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने बचावकार्य सुरु केले. जखमींवर शिरवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र व डॉ.जोगळेकर हॉंस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.