स्थैर्य, फलटण, दि.१०: फलटणमधील रुग्णालयांकडुन कोरोना बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणार्या वैद्यकीय उपचारांचे देयक पथकामार्फत तपासणी सुरु असून दिनांक 8 जून 2021 अखेर झालेल्या तपासणीमध्ये एकूण 100 रुग्णांकडून जादा आकारणी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून रु. 3 लाख 43 हजार 650 इतक्या रक्कमेचे अधिकचे बिल रुग्णांकडून घेण्यात आले आहे. या जादा घेण्यात आलेल्या रक्कमा संबंधित रुग्णांना रुग्णालयांनी परत करावयाच्या असून यासाठी फलटण तहसिलदार यांना प्राधिकृत करण्यात आले असल्याची माहिती, फलटण प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.
महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ बाधित रुग्णांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देणे. याबाबत शासनाने वेळावेळी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत आहे अगर कसे ? तसेच फलटणमधील रुग्णालयांकडुन कोरोना बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणारे बाबनिहाय वैद्यकीय उपचारांचे देयक योग्य आहे अगर कसे ? याची तपासणी सुरु असून याचा दि.8 जून 2021 पर्यंतचा तपासणी अहवाल याप्रमाणे –
सुविधा हॉस्पिटल – तपासलेली देयके 205, तफावत असलेली देयके 0, परत करावयाची एकूण रक्कम 0.
निकोप हॉस्पिटल – तपासलेली देयके 114, तफावत असलेली देयके 52, परत करावयाची एकूण रक्कम 2 लाख 25 हजार 900.
लाईफ लाईन हॉस्पिटल – तपासलेली देयके 552, तफावत असलेली देयके 35, परत करावयाची एकूण रक्कम 82,550.
सिद्धीविनायक हॉस्पिटल – तपासलेली देयके 93, तफावत असलेली देयके 13, परत करावयाची एकूण रक्कम 35,200.
एकूण – तपासलेली देयके 964, तफावत असलेली देयके 100, परत करावयाची एकूण रक्कम 3 लाख 43 हजार 650.
या तपासणीमध्ये इन्शुरन्सची देयके वगळता इतर देयके तपासणी करण्यात येत आहेत. ज्यादा रक्कम परत करण्यासाठी तहसीलदार यांना प्राधिकृत करण्यात आले असून देयकांची माहिती प्रांत कार्यालयात उपलब्ध आहे. ही माहिती रुग्ण वा जवळचे नातेवाईक यांना पाहण्यास उपलब्ध करुन दिली जाईल, असेही डॉ.शिवाजीराव जगताप यांनी कळविले आहे.