
दैनिक स्थैर्य । दि. १६ मे २०२२ । सातारा । राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सातारा पालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर २९ हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकतींवरील सुनावणी ता. २३ पर्यंत होणार असून त्यानंतर त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोगास सादर करण्यात येणार आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्दा निकाली काढत सर्वोच्च न्यायालयाने सर्वच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूकांची प्रभागरचना व इतर निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगास दिले होते. यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने सातारा पालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी मुळ शहरासह हद्दवाढीमुळे पालिकेत आलेल्या भागासह एकत्रित प्रभाग रचना जाहीर केली. यानुसार सातारा येथे व्दिसदस्यीय २५ प्रभाग तयार करण्यात आले असून त्यावरील हरकती नोंदविण्याचे आवाहन नागरीकांना करण्यात आले होते.
यापुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार सातारा पालिकेची प्रभाग रचना मार्च महिन्यात जाहीर केली होती. यावेळी काही हरकती प्राप्त झाल्या होत्या. याचदरम्यान प्रभाग रचनेला न्यायालयात आवाहन देण्यात आल्याने उर्वरित प्रक्रिया बंद पडली. यानंतर नव्याने मे महिन्यात सुरु केलेल्या प्रक्रियेदरम्यान आणखी काही नागरीकांनी आपल्या हरकती पालिकेच्या निवडणूक शाखेकडे सादर केल्या.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात पालिकेच्या २५ प्रभागांच्या रचनेवर एकूण २९ हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकती नेमक्या काय आहेत, कशावर आक्षेप घेण्यात आले आहेत, याच्या नोंदी ठेवत त्यावरील सुनावणी ता. २३ पर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे. यानंतर ता. ३० पर्यंत त्याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगास सादर करण्यात येणार आहे.