दैनिक स्थैर्य । दि. ०७ डिसेंबर २०२१ । सातारा । कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या वारसांना शासकीय मदत मिळवून देतो, असे सांगून सातारा व सांगली जिल्ह्यातील २८ जणांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून सातारा शहर पोलीस ठाण्यात मकरंद वाघ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघ हा शासकीय नोकर नसताना तो शासकीय नोकर आहे, असे सांगून त्याने सातारा, सांगली जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय मदत मिळवून देतो, असे भासवले. एवढेच नव्हे तर आमची अठराजणांची टीम आहे, असे तो वारंवार सांगत होता. त्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला. प्रत्येकाकडून वाघ याने ४३० रुपये घेतले, असे सुमारे १२ हजार ९०० रुपये त्याने उकळले. हे पैसे त्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वीकारले असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार लोकांच्या लक्षात येताच नागरिकांनी त्याला पकडून सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.