
दैनिक स्थैर्य । दि. १६ डिसेंबर २०२१ । फलटण । श्रीदत्त इंडिया प्रा. लि. साखरवाडी या साखर कारखान्याने यावर्षीच्या हंगामात दि. ३० नोव्हेंबर अखेर गाळपास आलेल्या ऊसाला एफआरपी प्रतिटन २७६१ रुपये एकरकमी ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात जमा केली असून कामगारांना नोव्हेंबर महिन्याच्या पगारापासून १२ % वेतनवाढ दिली असल्याची माहिती कारखान्याचे प्रशासन अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली आहे.
श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याने आपल्या तिसऱ्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला एक रक्कमी एफआरपी देण्याची आपली परंपरा कायम राखत दि. २२ ते ३० नोव्हेंबरपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाला प्रतिटन २७६१ रुपये प्रमाणे होणारी संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे प्रशासन अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली आहे.
कारखान्यातील कायम, हंगामी, संकलीत कामगारांच्या वेतनवाढीचा बाबत त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार ३२४ कामगारांना १२ टक्के वेतनवाढ नोव्हेंबर महिन्यापासून लागू केली असल्याचे अजितराव जगताप यांनी निदर्शनास आणून दिले आहे.