दैनिक स्थैर्य | दि. ९ एप्रिल २०२३ | फलटण |
साखरवाडी, तालुका फलटण येथील एका विवाहीत युवतीला उपशिक्षणाधिकारी पदावर नोकरी लावतो तसेच मुलांना पोलीस दलात भरती करतो, असे सांगून दौंड तालुक्यातील एकाने त्यांच्याकडून १५ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात विवाहितेचा सासरा शंकर किसन बोंद्रे (वय ५१, रा. खामगाव, ता. फलटण, जि. सातारा) यांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ज्ञानेश्वर किसन चिरमे (राहणार पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच शंकर बोंद्रे यांच्यासह इतरही तिघाजणांना आरोपी चिरमे याने सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुमारे १२.५० लाख रुपयांना फसविल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणाची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, जून २०१९ पासून वेळोवेळी साखरवाडी गावचे हद्दीत फिर्यादीची सून पल्लवी बोंद्रे हिस उपशिक्षणाधिकारी पदावर नोकरी लावतो, असे सांगून आरोपी ज्ञानेश्वर किसन चिरमे (राहणार पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे) याने ६ लाख ५० हजार रुपये घेतले. तसेच फिर्यादीची सून शिक्षण विभागाची परीक्षा पास झालेबाबत बनावट पत्र ई-मेलवर पाठवले. त्याबरोबरच फिर्यादीचा मुलगा सौरभ व ओंकार यास पोलीस दलात भरती करण्यासाठी फिर्यादीने आरोपीला ९ लाख रुपये पाठवले. तसेच फिर्यादीच्या ओळखीचे महादेव ढवळे यांची पुतणी प्रीती संजय ढवळे हीस पोलीस खात्यामध्ये भरती करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यावर १ लाख ८० हजार व १ लाख २० हजार रोख ज्ञानेश्वर यांना दिले आहेत. तसेच जगन्नाथ गायकवाड यांनी त्यांचा मुलगा अनिकेत यास पोलीस खात्यात भरती करण्यासाठी आरोपी यास ४.५० लाख रुपये रोख दिले व ५० हजार रुपये खात्यावर पाठवले. तसेच चैतन्य हिंदुराव घाडगे याला देखील पोलीस खात्यामध्ये भरती करतो असे सांगून ४.५० लाख रुपये त्यांचेकडून घेतले. यातील आरोपी ज्ञानेश्वर चिरमे याने आम्हा सर्वांना सरकारी नोकरी लावतो, असे सांगून माझ्यासह इतरांची फसवणूक केल्याची तक्रार शंकर बोंद्रे यांनी दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी ज्ञानेश्वर किसन चिरमे (राहणार पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून सपोनि शिंदे अधिक तपास करत आहेत.