अकृषीक विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या बेमुदत संपात फलटण तालुक्यामधील २६ कर्मचारी होणार सहभागी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १५ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०:२०:२० वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांना लागू करण्यात यावी, यासोबतच सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या चौदाशे दहा विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वेतन आयोग लागू करून १ जानेवारी २०१६ ते प्रत्यक्ष सातवा वेतन आयोग लागू झाला त्या कालावधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करण्यात यावी, या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने आंदोलन पुकारले आहे. यामध्ये फलटण तालुक्यामधील एकूण २६ शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले असून दिनांक २० फेब्रुवारी २०२३ पासून सर्व अकृषीक विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामध्ये फलटण तालुक्यामधील २६ शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत.

शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संपामध्ये फलटण तालुक्यामधील शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. या आंदोलनामध्ये दिनांक २ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील सर्व परीक्षांच्या कामकाजावर शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी बहिष्कार घातलेला आहे. त्यानंतर दिनांक १४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते २.३० या काळामध्ये निदर्शने व्यक्त करीत आपला निषेध नोंदवलेला आहे. आज दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सर्व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून कार्यालयीन कामकाजावर कार्यरत आहेत. दिनांक १६ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे व त्यानंतर दिनांक २० फेब्रुवारी पासून सर्व अकृषीक विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी बेमुदत संपाची हाक दिलेली आहे.


Back to top button
Don`t copy text!