दैनिक स्थैर्य | दि. १३ जुलै २०२४ | सातारा |
महिलांसह ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले करून चोरी करणार्या फलटण तालुक्यातील दोन सराईत चोरट्यांकडून स्थानिक गुन्हे शाखेने १ दरोडा, २३ जबरी चोरी, १ घरफोडीसह एकूण २६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यातील ३९ लाखांचे ५४ तोळ्यांचे दागिने जप्त केले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
याबाबतची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सातारा तालुक्यातील मालगाव येथे ऑक्टोबर २०२३ मध्ये वृध्द दाम्पत्याला जबर मारहाण करून शेतातील घरावर दरोडा टाकण्यात आला होता. तसेच लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत जून २०२४ मध्ये दोन महिलांना जबर मारहाण करून दागिने लुटण्यात आले होते. या गुन्ह्यांचा छडा लावण्याची सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला केली होती. दोन्ही गुन्हे रेकॉर्डवरील आरोपी शेख सुरेश भोसले (रा. खामगाव ता. फलटण, जि. सातारा) याने त्याच्या साथीदारासह केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली.
संशयित आरोपी हा फलटण भागात असल्याची माहिती मिळताच एसीबीच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या पथकाने फलटण भागात सापळा रचून आरोपीवर पाळत ठेवून आरोपी शेख सुरेश भोसले आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पोलिसांच्या तपासात संशयितांनी २६ गुन्ह्यांची कबुली दिली.
चोरीस गेलेल्या दागिन्यांपैंकी ३९ लाख ९ हजार रुपये किंमतीचे ५४ तोळ्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. आरोपींकडून चोरीचे सोने विकत घेणारा व्यक्ती निष्पन्न झाला आहे. मात्र, तो फरारी झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईबद्दल एसीबीच्या पथकाचं त्यांनी कौतुक केलं. दरम्यान, माहे नोव्हेंबर २०२२ पासून आजअखेर चोरीच्या गुन्ह्यातील ५ कोटी ५ लाख रुपये किंमतीचे ७ किलो दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.