स्थैर्य, मुंबई, दि.११: बँकिंगशी निगडीत एका नियमामध्ये १४ डिसेंबरपासून बदल
होणार आहे. दरम्यान, या बदलणा-या नियमाचा ग्राहकाना मोठा फायदाही होणार
आहे. १४ तारखेपासून रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंटची (आरटीजीएस) सुविधा २४ तास
मिळणार आहे. ग्राहकांना आरटीजीएसद्वारे ३६५ दिवस कोणत्याही वेळी पैसे
पाठवता येणार आहेत.
ऑक्टोबर महिन्यात आरटीजीएसची सुविधा २४ तास करण्याचा निर्णय रिझर्व्ह
बँकेनं घेतला होता. ही सुविधा २४ तास सुरू झाल्यानंतर ज्यांच्याकडे २४ बाय ७
बाय ३६५ लार्ज व्हॅल्यू रिअल टाईम पेमेंट सिस्टम असलेल्या जगातील अवघ्या
काही देशांच्या भारत सामील होणार असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं.
सध्या आरटीजीएसची सुविधा दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व रविवार सोडून
कामकाजाच्या इतर दिवशी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात उपलब्ध आहे.
आरटीजीएसद्वारे त्वरित पैसे पाठवण्यास मदत होते. मोठी रक्कम पाठवण्यासाठी
या सुविधेचा प्रामुख्यानं वापर केला जातो. निरनिराळ्या बँकांसाठी पैसे
पाठवण्याची मर्यादा ही निरनिराळी आहे. यापूर्वी डिसेंबर २०१९ मध्ये
इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरशी निगडीत नियमांत बदल करण्यात आला होता. गेल्या
वर्षापासून ग्राहकांसाठी २४ बाय ७ बाय ३६५ ही सुविधा उपलब्ध आहे.
आरटीजीएसद्वारे पाठवण्यात येणा-या पैशांना किमान मर्यादा नाही. तसंच कमाल
मर्यादा ही निरनिराळ्या बँकांवर अवलंबून आहे.