दैनिक स्थैर्य । दि. २६ जुलै २०२२ । सातारा । जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांच्या वतीने कमांडर विजयकुमार बा. पाटील (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांच्या प्रमुख उपस्थितीत महासैनिक भवन सातारा येथे 23 वा कारगिल विजय दिवस आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
या महोत्सवांतर्गत विविध सैनिकी अभिलेख कार्यालयाचे प्रतिनिधी, बँक प्रतिनिधी, संघटना यांच्या समवेत सैनिकांच्या निवृत्ती वेतनाविषयी व इतर अडीअडचणी सोडविण्यासाठी मेळावाही आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात सातारा जिल्हयातील कारगिल युध्दात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली व शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांचा सन्मान करण्यात आला. मागील दोन वर्षात शहीद झालेल्या सातारा जिल्हयातील 07 युध्द विधवा, कारगिल युध्दात शहीद झालेल्या 05 युध्द विधवा, वीरमाता, वीरपिता यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर युध्दात, मोहिमेत दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या 02 जवानांचा तसेच शौर्यपदक धारकांच्या वीरपत्नी, वीरमाता यांचाही सत्कार करण्यात आला.
मे. बोनिसा यांचे वतीने “एक इंडिया” या उपक्रमा अंतर्गत एक रिंग शहिदों के नाम म्हणून शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व शौर्य पदक धारकांच्या वीरपत्नी, वीरमाता यांना चांदी, सोने व डायमंड पासून बनविलेली रिंग देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मे. बोनिसाचे अध्यक्ष सुनिल मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
CPPC बँक ऑफ महाराष्ट्र, पुणेचे चीफ मॅनेजर अरविंद वायकोळे यांनी माजी सैनिकांना पेन्शन मिळण्याकरीता येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी काय केले पाहिजे या बाबत मार्गदर्शन केले. बँक खात्यातून पीन, ओटीपी मागवून पेन्शन खात्यातून पैसे काढण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्याबाबत खबरदारी घेण्याबाबतही मार्गदर्शन केले.
या वेळी मराठा लाईट इन्फंट्री, बाँबे इंजिनियरींग ग्रुप, सिग्नल्स, आर्मड कोर, ए.एस.सी. व मॅकेनाइज्ड इन्फंट्री अभिलेख कार्यालयाचे प्रतिनिधीनी माजी सैनिक, विधवा यांच्या निवृत्ती वेतना संबंधी तक्रारीचे निवारण केले. त्यावेळी सुभेदार मेजर व्ही. ए. नारायनन यांनी मार्गदर्शन केले.
माजी नगराध्यक्ष शंकर माळवदे, नौसेना मेडल, यांनी आपल्या मार्गदर्शनात नागरी जीवनात सेवारत व माजी सैनिकांना किती अडीअडचणी येतात व त्या सोडविण्यासाठी नगरपरिषद सातारा येथे सैनिकांची कामे प्राधान्याने सोडविण्यासाठी सैनिक कक्षाची स्थापना केली आहे. आपण सर्वजण संघटीत राहिल्यास अशा समस्यांचे निराकरण लवकरात लवकर होण्यास मदत होईल. माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजनांसाठी नगरपरिषद, नगरपंचायत व पंचायत समिती मध्ये निधीची तरतूद करुन दिली असल्याचेही अवगत केले.
या कार्यक्रमासाठी माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता उपस्थित होते.