दैनिक स्थैर्य | दि. २० ऑगस्ट २०२३ | फलटण |
पावसाने ओढ दिल्याने फलटण तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत टंचाई आढावा घेण्यात आला. यावेळी आ. दिपक चव्हाण यांनी तालुक्यात जनावरांना दररोज २३२५ मे. टन चार्याची गरज असल्याचे सांगून शेतकर्यांना चारा पिके घेण्याचे आवाहन केले आहे.
या आढावा बैठकीस सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, नायब तहसीलदार तुषार देशमुख, महसूल नायब तहसीलदार एन. डी. काळे, निवासी नायब तहसीलदार डॉ. सौ. डी. एस. बोबडे – सावंत, संजय गांधी योजना नायब तहसीलदार डॉ. भक्ती सरवदे, निवडणूक नायब तहसीलदार शबाना बागवान उपस्थित होत्या.
जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर चार्याची व्यवस्थाही करावी लागणार आहे. तालुक्यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने दुभत्या जनावरांची संख्या मोठी आहे. आज तालुक्यात ९९ हजार १९७ गाय बैल, १७ हजार २८ म्हैस अशी एकूण १ लाख १६ हजार २२५ मोठी आणि ८६ हजार ३८६ शेळ्या व ४७ हजार ६६४ मेंढ्या अशी एकूण १ लाख ३४ हजार ५० छोटी जनावरे आहेत.
मोठ्या जनावरांना दररोज प्रतेकी १८ किलो ओला आणि ६ किलो सुका असा एकूण २४ किलो तर छोट्या जनावरांना दररोज प्रत्येकी २ किलो म्हणजे तालुक्यात दररोज २ हजार ३२५ मे. टन चार्याची आवश्यकता आहे. आज कोणाकडेही फारसा चारा साठवून ठेवलेला नसल्याने ज्या शेतकर्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी मका, कडवळ यासारखी चारा पिके घ्यावीत, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
शेती महामंडळ १०० हेक्टर क्षेत्रावर चारा पिके घेण्याची सूचना
दरम्यान, या बैठकीत शेती महामंडळ तालुक्यात उपलब्ध असलेल्या क्षेत्रापैकी १०० हेक्टर क्षेत्रावर मका, कडवळ ही चारा पिके घेण्याचे नियोजन महसूल प्रशासनाने करावे, अशी सूचना आ. दिपकराव चव्हाण यांनी या बैठकीत केली. शासनाने चारा छावण्या सुरू केल्या तरी तेथे चारा उपलब्ध करून देण्यासाठी आतापासून तयारी करावी लागणार असल्याचे यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.