दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑक्टोबर २०२१ | सातारा | जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी १७ उमेदवारांनी विविध मतदारसंघातून आपले २२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बहुतांशी अर्ज ‘प्राथमिक कृषी पतपुरवठा’ आणि ‘महिला राखीव’मधून दाखल झाले आहेत. ‘खटाव’मधून प्रभाकर घार्गे यांच्या पत्नी इंदिरा घार्गे आणि जावळी’तून ज्ञानदेव रांजणे यांनी अर्ज दाखल केला आहे, तर जि. प.चे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक यांनी ‘कोरेगाव’ तर मनोज पोळ यांनी ‘माण’मधून अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असून याचदिवशी सर्वाधिक अर्ज दाखल होणार आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी चौथा दिवस होता. त्यामुळे यादिवशी तरी प्रमुख उमेदवार आणि राजकीय नेतेमंडळी अर्ज दाखल करतील, असे वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. आता तर अर्ज दाखल करण्यासाठी फक्त दोनच दिवस बाकी आहेत. त्यामुळे सर्व दिग्गज नेते सोमवारीच अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व इच्छुक नेते सोमवार, दि. २५ ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार आहेत.
शुक्रवारी अर्ज कोण कोण दाखल करणार, याची उत्सुकता अनेकांना होती. मात्र, प्रमुख इच्छुकांपैकी कोणीही अर्ज दाखल केलेले नाहीत. ‘जावळी प्राथमिक कृषी पतपुरवठा’तून ज्ञानदेव किसन रांजणे यांनी तीन अर्ज दाखल केले आहेत. ‘कोरेगाव प्राथमिक कृषी पतपुरवठा’तून शिवाजीराव महाडिक यांचे दोन अर्ज, ‘खटाव प्राथमिक कृषी पतपुरवठा’तून प्रभाकर घार्गे यांच्या पत्नी इंदिरा घार्गे यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. ‘माण प्राथमिक कृषी पतपुरवठा’तून मनोजकुमार पोळ यांनी अर्ज दाखल केला आहे.
जिल्हा बँकेच्या ‘महिला राखीव’ गटात उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार स्पर्धा आहे. येथून शुक्रवारी खटावच्या शशिकला जाधव-देशमुख यांनी दोन अर्ज तर जावळीच्या जयश्री वसंतराव मानकुमरे, पाटण येथील विश्रांती विजय देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, ‘अनुसूचित जाती , जमाती’ प्रवर्गातून मधूकर ज्ञानदेव भिसे, सुरेश बापू सावंत आणि ‘इतर मागास प्रवर्गा’तून पांडुरंग बबन शिरवाडकर, ‘विमुक्त जाती, भटक्या जमाती’तून तात्यासोा आबाजी धायगुडे, भागूजी विठ्ठल शेळके, जोतीराम बापूराव अवकीरकर यांनी अर्ज दाखल केले. ‘नागरी बँका, नागरी पतपेढ्या’तून कोरेगावचे मनोहर वसंतराव बर्गे, सौरभ राजेंद्र शिंदे, मिलिंद तानाजी पाटील यांचे अर्ज आले आहेत.