
स्थैर्य, फलटण, दि. 25 ऑगस्ट, प्रसन्न रुद्रभटे : फलटण तालुक्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत झालेल्या मोठ्या उलथापालथी, प्रमुख नेत्यांचे पक्षांतर आणि नुकतीच जाहीर झालेली प्रारूप प्रभाग रचना यांमुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीचे चित्र अत्यंत गुंतागुंतीचे आणि चुरशीचे बनले आहे. २०१६ च्या निकालांचे विश्लेषण केले असता, अनेक जागांवर निसटते विजय मिळाले होते. आता बदललेल्या परिस्थितीत जुन्या निकालांचे महत्त्व कमी झाले असून, नव्या राजकीय समीकरणांमुळे निवडणुकीत मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत.
२०१६ साली राष्ट्रवादी काँग्रेसने (राजे गट) १७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते, तर काँग्रेसला (तेव्हाचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर) ८ जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र, त्यातील अनेक जागांवर विजय-पराजय केवळ ५०० पेक्षा कमी मतांच्या फरकाने ठरला होता.
निसटत्या विजयाचे प्रभाग :
त्या निवडणुकीत काँग्रेसच्या ज्योती खरात (१४ मते), अशोक जाधव (६२ मते), तर राष्ट्रवादीच्या असिफ मेटकरी (७४ मते) आणि दिपाली निंबाळकर (७८ मते) यांसारखे उमेदवार १०० पेक्षा कमी मतांच्या फरकाने विजयी झाले होते. याशिवाय इतरही अनेक उमेदवार ५०० पेक्षा कमी मताधिक्याने जिंकले होते, ज्यामुळे तेव्हाही अनेक प्रभागांमध्ये तुल्यबळ लढत झाल्याचे स्पष्ट होते.
बदललेली राजकीय समीकरणे आणि नवी आव्हाने :
तेव्हापासून आतापर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर विधानसभा निवडणुकीत विधानसभेवर असलेली ३० वर्षांची राजे गटाची सत्ता संपुष्टात आली. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे, राजे गटाचे अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते आता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे राजे गटासमोर दुहेरी आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे त्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी द्यावी लागणार आहे, तर दुसरीकडे ज्यांनी गट सोडला आहे, त्यांचा पराभव करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी उतरावे लागेल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
या सर्व राजकीय घडामोडींमध्ये, नुकत्याच जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेने आणखी भर टाकली आहे. या नव्या रचनेमुळे कोणत्याही दिग्गजाला किंवा माजी नगरसेवकाला आपला हक्काचा प्रभाग राहिलेला नाही. त्यामुळे निष्ठावान उमेदवार आणि दलबदलू नेते या सर्वांनाच नव्या समीकरणांना सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, २०१६ चे निसटते निकाल, सध्याची राजकीय फाटाफूट आणि नवी प्रभाग रचना यांमुळे आगामी नगरपरिषद निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अनिश्चिततेची ठरणार आहे, हे मात्र नक्की.