स्थैर्य, पुणे, दि. 02 : राज्य शासनाच्या आदेशाचा फटका बसल्याने आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील 200 विद्यार्थी नापास झाल्याने खळबळ उडाली. विद्यार्थी, पालक आश्चर्यचकीत झाले असून याप्रकरणी पालक, विद्यार्थी संघटना यांनी शिक्षण आयुक्त, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे दाद मागितली आहे.
करोना पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 13 एप्रिल रोजी इयत्ता अकरावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. प्रथमसत्र, प्रॅक्टिकल परीक्षा यासह अंतर्गत मूल्यांकनानुसार विद्यार्थ्यांना गुण देवून उत्तीर्ण करून इयत्ता बारावीच्या वर्गात प्रवेश द्यावेत, असे आदेश होते. या आदेशानुसार, कनिष्ठ महाविद्यालयांनी निकाल लावले. यातून महाविद्यालयांचे धक्कादायक निकाल पुढे येत आहेत.
आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील 147 व कला शाखेतील 60 विद्यार्थी अकरावीत नापास झाल्याचा प्रकार नुकताच उघड झाला. या प्रकारामुळे विद्यार्थी, पालकांना हादरा बसला आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळालेले विद्यार्थीही अकरावीत नापास झाले आहेत. परीक्षा झाल्या असत्या तर नक्कीच विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले असते, असे पालकांचे म्हणणे आहे.
नियमाप्रमाणेच निकाल लावलेतशालेय शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशाप्रमाणे मुल्यांकन करूनच अकरावीतील विद्यार्थ्यांचे निकाल लावले आहेत. निकाल लावताना कोणतीही चूक झालेली नाही, अशी माहिती आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. बी. बुचडे यांनी दिली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाकडून सुधारित सूचना येणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले.