दैनिक स्थैर्य । दि. २४ एप्रिल २०२२ । कराड । कराड तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर एकाने अत्याचार केयाची घटना घडली होती. याप्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार या खटल्याची सुनावणी कराड येथील विशेष न्यायाधीश एस.के. होरे यांच्यासमोर सुरू होती. याप्रकरणी विशेष न्यायाधिश एस.के. होरे यांनी आरोपीस दोषी धरत बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत दोन वेगवेगळ्या कलमाखाली त्याला २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच यामध्ये २० हजार रुपयांच्या दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे. प्रशांत आप्पा आवळे असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी सरकारी वकीलांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी प्रशांत आवळे हा पिडीत मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत ती घरी एकटी असताना तिच्यावर अत्याचार करत होता. यातून पिडीता पाच महिन्यांची गरोदर राहिली. अत्याचार वाढल्याने पिडीतेने याबाबत २५ नोव्हेंबर २०२० रोजी कराड तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक दीपज्योती पाटील यांनी आरोपी प्रशांत आवळे याला अटक केली.
त्यानंतर या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश एस.के. होरे यांच्यासमोर सुरू होती. याप्रकरणी सरकारी वकील राजेंद्र शहा यांनी ९ साक्षीदार तपासले. तसेच पंचनामा अहवाल व पिडीतेच्या उपजिल्हा रूग्णालयातील तपासणी अहवाल दाखल केला. बचाव पक्षाच्या वकीलांनी पिडीता व आरोपी यांचे प्रेमप्रकरण असल्याचा युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला. सरकार पक्षाने घेतलेल्या साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे विशेष न्यायाधिश एस.के. होरे यांनी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच यामध्ये २० हजार रुपयांच्या दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे. सरकार पक्षाला महिला पोलीस हवालदार पाटील, महिला पोलीस गोरे, अशोक मदने, हवालदार गोविंद माने, वाय.जी. पवार, कॉन्स्टेबल कार्वेकर यांचे सहकार्य लाभले.