मलटणमध्ये पूर्ववैमनस्यातून मसाला विक्री करणार्‍या कुटुंबावर २० ते २५ जणांचा तलवार, कुर्‍हाडीने हल्ला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ९ मार्च २०२३ | फलटण |
मलटण (ता. फलटण) येथील गोसावी गल्लीतील स्वामी समर्थ मंदिराजवळ मंगळवार, दि. ७ मार्च रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास मसाला विक्रीचा व्यवसाय करणार्‍या कुटुंबावर पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून इंदिरानगर झोपडपट्टी (मलटण) तील सुमारे २० ते २५ जणांच्या जमावाने तलवार, कुर्‍हाड, लोखंडी पाईप, गावठी कट्टा तसेच दगडाने हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले आहे. यावेळी जमावाने त्यांच्या मसाला विक्रीच्या दुचाकी व चारचाकी गाड्यांचीही तोडफोड करून त्यांचे नुकसान केले आहे. या प्रकरणी सचिन सुभाष चव्हाण यांनी फलटण शहर पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी सुमारे ११ जणांसह इतर दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सनी माणिक जाधव, रोहित राजू जाधव, मुकेश माणिक जाधव, अनिकेत बनसोडे, दिगंबर जाधव, अर्जुन राजू जाधव, आकाश सावंत, आशा संजय जाधव, चांदणी मुकेश जाधव, रूपाली (पूर्ण नाव माहीत नाही), अभिषेक इल्ला व इतर अज्ञात दहा ते पंधरा जणांचा समावेश आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, फिर्यादी सचिन सुभाष चव्हाण हे मलटण (ता. फलटण) मधील गोसावी गल्लीतील स्वामी समर्थ मंदिराजवळ आपली पत्नी सौ. राधा, आई सौ. विमल, वडील सुभाष श्रीपती चव्हाण, लहान भाऊ अमोल, भावजय काजल यांच्यासह राहतात. त्यांचा मसाला विक्रीचा व्यवसाय आहे. दि. ७ मार्च २०२३ रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास सचिन चव्हाण, त्यांच्या घरातील लोक व शेजारील लोक गोसावी गल्लीतील स्वामी समर्थ मंदिराजवळ देवदेवाचा कार्यक्रम साजरा करत होते. त्यावेळी मागील झालेल्या भांडणाच्या कारणावरून सनी माणिक जाधव, रोहित राजू जाधव, मुकेश माणिक जाधव, अनिकेत बनसोडे, दिगंबर जाधव, अर्जुन राजू जाधव, आकाश सावंत, आशा संजय जाधव, चांदणी मुकेश जाधव, रूपाली (पूर्ण नाव माहीत नाही), अभिषेक इल्ला व इतर अज्ञात दहा ते पंधरा जण (सर्व रा. इंदिरानगर झोपडपट्टी, मलटण, ता. फलटण, जि. सातारा) यांनी आपापसात संगनमत करून येऊन माझे घरात घुसून तसेच माझे घरातील लोकांना व नातेवाईकांना हातातील तलवार, लोखंडी पाईप, कुर्‍हाड, चाकू, दगड व गावठी कट्टा (छोटी बंदूक) अशा हत्यारांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी करत जखमी केले. तसेच आमचे व आमच्या शेजारील नातेवाईकांच्या मसाला विक्रीच्या दुचाकी व चारचाकी गाड्यांची तोडफोड करत नुकसान केले. या मारहाणीत रोहित बाळू घाडगे, पिंटू जयसिंग चव्हाण, सचिन सुभाष चव्हाण व शेजारील इतर काहीजण जखमी झाले आहेत. मारहाणीनंतर वरील सर्व आरोपी पळून गेले, असे सचिन सुभाष चव्हाण यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी फलटण शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी वरील ११ आरोपींसह इतर अज्ञात दहा ते पंघरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!