बाह्यवळणाला जोडणारे 20 पालखी मार्ग चार पदरी करणार : मंत्री जयकुमार गोरे


दैनिक स्थैर्य । 30 जून 2025 । सातारा । संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर या महामार्गाच्या बाह्यवळणाला जोडणारे 20 मार्ग हे अरुंद आहेत, त्यामुळे पालखी सोहळ्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या बाह्यवळणाला जोडणारे 20 अरुंद रस्ते चौपदरी करणार व महिलांसाठी 2000 शौचालये निर्माण करणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

तरडगाव मुक्कामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास मंत्री गोरे यांनी भेट दिली व माऊलींचे दर्शन घेतले. प्रमुख विश्वस्थ योगी निरंजनाथ यांनी त्यांचा शाल, श्रीफळ देवून सन्मान केला. यावेळी मंत्री गोरे यांच्याकडे आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यातील अडचणी विश्वस्तांनी मांडल्या यावेळी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम पाटील, व्यवस्थापक माऊली वीर आदी उपस्थित होते.

मंत्री गोरे म्हणाले, सध्या पालखी महामार्गाचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण होताच या महामार्गाच्या बाह्यवळणाला जोडणारे जे 20 अरुंद रस्ते आहेत ते चारपदरी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेवून येत्या वर्षभरात ही कामे पूर्ण केली जातील. पुढील वर्षी आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर वाहतुकीची कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेतली जाईल. यंदा पालखी सोहळ्यात 1800 मोबाईल टॉयलेट उभारण्यात आली आहेत. त्यासाठी शासनाने 15 कोटी रुपये खर्च केले आहेत. हा खर्च दरवर्षी न परवडणारा आहे त्यासाठी पालखी तळावर कायमस्वरूपी शौचालय बांधली जातील.

तसेच महिलांसाठी नवीन 2000 शौचालय बांधली जातील असे ते म्हणाले. यंदा शासनातर्फे वारकर्‍यांना आरोग्य, पाणी पुरवठा, निवारा, रेनकोट आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. पुढील वर्षी पालखी सोहळ्यात अडचणी येऊ नयेत यासाठी पालखी सोहळे परत गेल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृहात बैठक घेतली जाईल म्हणजे पुढील वर्षीचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल असे ते म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!