
फलटण तालुक्यातील आंदरूड येथील एका २२ वर्षीय विवाहितेचा माहेरून २० लाख रुपये व सोन्याचे दागिने आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून अमानुष छळ करण्यात आला. सासऱ्याच्या मृत्यूनंतर सावडण्याच्या विधीदिवशीच विवाहितेला व तिच्या आई-वडिलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर फलटण ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 16 मार्च : फलटण तालुक्यातील आंदरूड येथे एका उच्चशिक्षित विवाहितेचा हुंड्यासाठी आणि पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी सासरच्या मंडळींनी भयंकर मानसिक व शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरच्या मंडळींनी माहेरून तब्बल २० लाख रुपये आणावेत यासाठी तिचा अमानुष छळ केला. एवढेच नव्हे तर सासऱ्याच्या अपघाती मृत्यूनंतर सुनेलाच जबाबदार धरून सावडण्याच्या विधीच्या दिवशीच तिला व तिच्या गरीब आई-वडिलांना बेदम मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. या संतापजनक घटनेची अधिकृत माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून देण्यात आली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनने दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, या प्रकरणातील २२ वर्षीय पीडित विवाहितेचे लग्न जून २०२५ मध्ये आंदरूड (ता. फलटण) येथील आकाश शिवाजी राऊत याच्यासोबत झाले होते. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच सासू आणि नणंदेने तिला ‘माहेरून दागिने का आणले नाहीत?’ असा जाब विचारून थेट मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. पीडितेच्या घरची परिस्थिती गरिबीची असल्याने दागिने देणे शक्य नसल्याचे तिने वारंवार समजावून सांगितले. मात्र, सासरच्यांनी तिच्याशी बोलणेच बंद केले आणि क्षुल्लक कारणांवरून तिला सतत टोमणे मारण्यास सुरुवात केली.
पीडितेचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती पतीसोबत मुंबई येथील नेरूळ येथे राहण्यास गेली होती. त्यानंतर तिचा पती कामाच्या निमित्ताने पुण्यात स्थलांतरित झाला. या काळात सासू आणि नणंदेने तिला घरकामावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा प्रकार तिने पती आकाश याला सांगितला असता, पतीने तिची बाजू घेण्याऐवजी ‘तुला पुण्यात राहायचे असेल तर घर घेण्यासाठी तुझ्या वडिलांकडून वीस लाख रुपये घेऊन ये’, असा पैशांचा तगादा लावला. ‘माझी एवढी रक्कम देण्याची ऐपत नाही’ असे सांगितल्यावर पतीने तिला शिवीगाळ करत, त्रास सहन होत नसेल तर माहेरी चालती हो, अशी धमकी दिली.
या सततच्या जाचाला कंटाळून पीडिता काही काळ आपल्या माहेरी विडणी येथे निघून आली होती. त्यानंतर दोन्ही कुटुंबांतील नातेवाईकांनी एकत्र बसून समझोता केला आणि भांडण मिटवून पीडितेला पुन्हा पतीसोबत पुण्यात पाठवले. काही काळ सर्व व्यवस्थित चालले असतानाच, एका किरकोळ कारणावरून सासऱ्याचे आणि पतीचे फोनवर मोठे भांडण झाले. या भांडणाचा राग पतीने पुन्हा पत्नीवर काढला आणि तिला तडकाफडकी माहेरी पाठवून दिले. ती माहेरी पोहोचल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी तिच्या सासऱ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी तिला समजली.
सासऱ्याच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी पीडिता आंदरूड येथे सासरी गेली होती. मात्र, ३० डिसेंबर २०२५ रोजी सासऱ्याच्या सावडण्याच्या विधीदिवशीच सासरच्या मंडळींनी अमानुषपणाचा कळस गाठला. सासूने ‘तुझ्यामुळेच माझा नवरा मेला’ असा थेट आणि गंभीर आरोप करत पीडितेला व तिच्या आई-वडिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर पती आकाश राऊत, नणंद, चुलत सासरा अनिल दत्तात्रय राऊत आणि चुलत सासू यांनी मिळून या असहाय्य विवाहितेला आणि तिच्या आई-वडिलांना सर्वांसमक्ष लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व धक्के मारून घराबाहेर हाकलून दिले.
या भयानक प्रकारानंतर पीडितेने सुरुवातीला पोलिसांत अदखलपात्र (NC) तक्रार दिली होती. त्यानंतर महिला समुपदेशन केंद्रात हा वाद सोडवण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यातही कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर पीडितेच्या फिर्यादीवरून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये हुंडाबळी व कौटुंबिक छळाचा कडक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पती आकाश शिवाजी राऊत, चुलत सासरा अनिल दत्तात्रय राऊत यांच्यासह सासू, नणंद आणि चुलत सासू (कायद्यानुसार महिला आरोपींची नावे वगळण्यात आली आहेत) अशा एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस या गंभीर प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.

