स्थैर्य, पुणे, दि. ०३ : पुणे शहरातील विविध भागांत घरफोडी करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेने अटक केली होती. त्याच्याकडून 260 ग्रॅम सोने, 556 ग्रॅम चांदी, टीव्ही असा 13 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. त्याने विक्री केलेले 50 ग्रॅम सोन्याचे दागिने नेवासा, नगर, येवला परिसरातून जप्त करण्यात आले आहेत. यापूर्वी त्याच्याविरुद्ध पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल 38 गुन्हे दाखल आहेत.
विक्रम विठ्ठलसिंग ठाकूर (वय 32, रा. रुपीनगर, निगडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याशिवाय दागिने खरेदी करणारा सराफ रामचंद्र उर्फ हनुमंत दगडू मोहिते (वय 31) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत घरफोडी करणारा विक्रम ठाकूर रुपीनगर परिसरात घरफोडी करण्यासाठी आला असता पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
चौकशीत त्याने कात्रज, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, बावधन, रहाटणी, चिखली परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरी केलेले दागदागिने तो आटपाडीत राहणाऱ्या रामचंद्र उर्फ हनुमंतला विकत असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यालाही अटक केले. त्याशिवाय विक्रमने नेवासा, नगर, येवला येथेही दागिन्यांची विक्री केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. त्यानुसार गुन्हे शाखेने त्याठिकाणी जाउन 2 लाख 67 हजार रुपये किंमतीचे 50 ग्रॅम सोने जप्त केले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, हनुमंत शिंदे, विजेसिंग वसावे, अशोक माने, उमेश काटे, अजय जाधव, अश्विनी केकान यांच्या पथकाने केली.