
दैनिक स्थैर्य । 11 मार्च 2025 । सातारा । लाडकी बहीण योजनेमुळे अडखळलेला नवीन आमदारांचा निधी उपलब्ध झाला आहे. प्रत्येकी एक कोटी 80 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे नवीन आमदारांना त्यांच्या मतदारसंघात मंजूर केलेल्या कामांवर हा निधी खर्च करता येणार आहे. जिल्ह्यात पूर्वीचे चार आमदार, मंत्री असून, चार नवे आमदार आहेत. विधान परिषदेचे दोन आमदार यांचा यामध्ये समावेश असून, जिल्ह्याला 18 कोटींचा निधी मिळाला आहे.
जिल्ह्यात एकूण दहा आमदार असून, आठे विधानसभेचे आणि दोन विधान परिषदेच्या आमदारांचा समावेश आहे. प्रत्येक आमदाराला वर्षाला पाच कोटींचा निधी मिळतो. ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे त्यानंतर आमदारांना निधी उपलब्ध झाला नव्हता, तसेच निवडणुकीपूर्वी आमदार असलेल्यांचाही निधी आचारसंहितेमुळे थांबला होता. तो निधीही आता उपलब्ध झाला आहे.
यामध्ये निवडणुकीपूर्वीचा तीन कोटी 20 लाख रुपये व निवडणुकीनंतरचा एक कोटी 80 लाख असा पाच कोटींचा निधी 2024 मधील आमदारांना मिळाला आहे. त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर नव्याने आमदार झालेल्यांना आता प्रत्येकी एक कोटी 80 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.
जिल्ह्यात दहा आमदार असल्याने त्यांना एकूण 18 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. आमदार निधीतून मतदारसंघात विविध विकासकामे केली जातात. यामध्ये स्थानिक विकास कार्यक्रमातून रस्ते, समाजमंदिर, शाळागृहे, वॉलकंपाऊंड, साकव पूल, मोर्या, संरक्षक भिंत, मध्यम पुलांची उभारणी अशी कामे होतील.