दैनिक स्थैर्य । दि. ११ एप्रिल २०२३ । फलटण । राज्यातील शेतकऱ्यांना अपघातांमुळे बऱ्याचता मृत्यु ओढावतो किंवा दिव्यांगत्व येते. अशा मृत्यु झालेल्या व दिव्यांगत्व आलेल्या फलटण तालुक्यातील 17 वारसदारांच्या खात्यावर 33 लाखांचे वितरण थेट बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. तर सातारा जिल्ह्यातील 108 शेतकऱ्यांच्या वारसदारांच्या खात्यावर 2 कोटी 12 लाख रुपये जमा करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, जंतूनाशक अथवा अन्य कारणाने विषबाधा, विजेचा धक्का अपघात, विज पडून मृत्यू, उंचावरुन पडून झालेला अपघात वा मृत्यू, सर्पदंश/विंचूदंश, नक्षलवाद्याकडून झालेली हत्या, जनावरांच्या चावण्याने/हल्ल्यामुळे जखमी/मृत्यू, जनावरांच्या चावण्याने रेबीज होऊन मृत्यू, जखमी होऊन मृत्यू, जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होऊन शव न मिळणे अन्य कोणतेही अपघात ग्राहय धरला जातो.
सातारा तालुक्यातील 15 मंजूर दाव्यांसाठी 30 लाख रुपये, कोरेगाव तालुक्यासाठी 17 दाव्यांसाठी 34 लाख रुपये, खटाव तालुक्यातील 5 दाव्यांसाठी 9 लाख रुपये, कराड तालुक्यातील 17 दाव्यांसाठी 34 लाख रुपये, पाटण तालुक्यातील 7 दाव्यांसाठी 14 लाख रुपये, वाई तालुक्यातील 5 दाव्यांसाठी 10 लाख, जावली तालुक्यातील 5 दाव्यांसाठी 10 लाख रुपये, महाबळेश्वर तालुक्यातील 2 दाव्यांसाठी 4 लाख, खंडाळा तालुक्यातील 3 दाव्यांसाठी 6 लाख रुपये, फलटण तालुक्यातील 17 दाव्यांसाठी 33 लाख रुपये व माण तालुक्यातील 15 दाव्यांसाठी 28 लाख रुपये असे एकूण 108 दाव्यांसाठी 2 कोटी 12 लाख रुपये वारसदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.