स्थैर्य, फलटण, दि.11 नोव्हेंबर : राज्यातील पायाभूत सुविधांना बळकटी मिळावी यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु असून राज्यातील विविध जिल्ह्यातील 103 रस्ते व पुलांच्या कामांसाठी केंद्रीय रस्ते निधीमधून तब्बल 1688 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील रस्ते व पुलांच्या 15 कामांसाठी 201.5 कोटी रुपये निधीचा ’बूस्टर डोस’ मिळाला आहे. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आणि यासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
राज्यातील रस्ते दर्जेदार होऊन वाहतूक सुरक्षित व निर्धोक व्हावी यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी मिळवण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री ना. फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. पवार आणि ना. शिंदे यांच्या सहकार्याने राज्यातील 103 कामांसाठी केंद्रीय रस्ते निधीमधून 1688 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील महत्वाच्या 15 कामांसाठी 201.5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. भरीव निधी उपलब्ध झाल्याने मंजूर कामे तातडीने मार्गी लागणार असून जिल्ह्यातील पायाभूत सुविधा बळकट होतील, असा विश्वास ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातील विविध तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण, मजबुतीकरण प्राधान्याने करण्यात येणार असून आवश्यक तेथे मोठ्या पुलांचे बांधकाम केले जाणार आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले आहे. आगामी काळात जिल्ह्यातील आवश्यक असणार्या प्रमुख रस्ते, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग यासह ग्रामीण मार्गांचे रुंदीकरण, मजबुतीकरण करून दळणवळण सुकर करण्याला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याबाबत राज्य आणि केंद्र स्तरावर पाठपुरावा सुरु असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मंजूर झालेल्या कामांची निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून कामे सुरु करा, तसेच कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकार्यांना केल्या आहेत.
