
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीअंतर्गत सातारा जिल्ह्यात गेल्या एका वर्षात १६०० गरजू आणि पात्र रुग्णांना सुमारे १२ कोटी ९६ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. 11 एप्रिल : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत मिळू न शकलेल्या पात्र आणि गरजू रुग्णांसाठी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’ खऱ्या अर्थाने एक मोठा ‘आधार’ आणि संजीवनी ठरत आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात केवळ सातारा जिल्ह्यात तब्बल १६०० रुग्णांना जीवनदान देण्यासाठी सुमारे १२ कोटी ९६ लाख रुपयांची घसघशीत वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि वेगात वाढ:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत मोठे सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. विशेषतः जिल्हा कक्षाची स्थापना, पूर्णपणे ‘पेपरलेस’ अर्ज प्रक्रिया आणि अर्जांचा तातडीने निपटारा केल्यामुळे मदत वितरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. यासोबतच शासनाने विविध धर्मादाय रुग्णालये, संस्था आणि दात्यांसोबत सामंजस्य करार व क्राउड फंडिंगच्या माध्यमातून समाजाचे मोठे सहकार्य मिळवले आहे. त्यामुळे अधिकाधिक पात्र रुग्णांना आता पारदर्शकपणे आणि वेळेत आर्थिक साहाय्य मिळत आहे.
या २० गंभीर आजारांवर मिळते आर्थिक मदत:
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून खालील २० गंभीर आजारांवरील उपचारांसाठी अर्थसाहाय्य दिले जाते:
-
कॉक्लियर इम्प्लांट (२ ते ६ वयोगट)
-
हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस व बोन मॅरो प्रत्यारोपण
-
हाताचे व गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट
-
कर्करोग शस्त्रक्रिया, केमोथेरपी व रेडिएशन
-
रस्ते अपघात व विद्युत अपघात रुग्ण
-
लहान बालकांची शस्त्रक्रिया आणि नवजात शिशुंचे आजार
-
मेंदूचे आजार व हृदयरोग
-
डायालिसिस, अस्थिबंधन आणि बर्न (भाजलेले) रुग्ण.
सामंजस्य करारातून कर्करोगग्रस्त बालकांना मोठा आधार:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नुकताच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन (BPCL Foundation) व टाटा मेमोरियल सेंटर (Tata Memorial Center) यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे ‘सामाजिक दायित्व निधी’तून (CSR) विशेष निधी उपलब्ध होणार असून, आर्थिक अडचणींअभावी गरजू बालकांना आता गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत.
एका वर्षातील राज्याची आणि जिल्ह्याची आकडेवारी (१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६):
-
संपूर्ण महाराष्ट्र: ४०,७७६ रुग्णांना तब्बल ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत.
-
सातारा जिल्हा: १६०० रुग्णांना १२ कोटी ९६ लाख २० हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत.
गरजू व पात्र रुग्णांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याकरिता आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी १८०० १२३ २२११ या ‘टोल फ्री’ क्रमांकावर संपर्क साधावा, असे विशेष आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
