
दैनिक स्थैर्य । दि. २१ ऑक्टोबर २०२२ । सातारा । परळी खोऱ्यातील सावली ता. सातारा गावच्या हद्दीत रानडुक्कराची शिकार करून मांस विक्री करणाऱ्या १६ जणांना वनविभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याजवळील मांस जप्त करत वन्यप्राणी शिकार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सावली गावच्या हद्दीत रानडुक्कराची शिकार करून मासांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती सातारा वनविभागाला मिळाली. वनविभागाने तात्काळ पथक तयार करून त्या ठिकाणी छापा टाकला. गावातील साजन साळुंखे, शंकर भिलारे, वंदना बादापुरे, जनार्दन साळुंखे, भाऊ साळुंखे, बळीराम साळुंखे, लिलाबाई साळुंखे, हणमंत साळुंखे, लक्ष्मण साळुंखे, नथुराम साळुंखे, विष्णु साळुंखे, रामचंद्र साळुंखे, सिद्धू साळुंखे, यशोदा साळुंखे, विष्णु साळुंखे आणि किशोर साळुंखे या १६ जणांना तुकडे केलेल्या मासांसह रंगेहाथ पकडले.
त्यांच्यावर वन्यप्राणी शिकार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावली गावच्या हद्दीत गावठी कुत्रे व काठ्यांच्या सहाय्याने शिकार होत असल्याचे समोर आले असून, पुढील तपास रोहोट वनपाल राजाराम काशीद, वनरक्षक सुनिल शेलार, साधना राठोड आदी करत आहेत.