स्थैर्य, चेन्नई, दि.९: कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात येणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून पहिल्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. आणि दुसरा कसोटी सामनाही याच मैदानावर खेळवला जाणार आहे. मुख्य बाब म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय स्टेडियम मध्ये प्रेक्षकांना येऊन लाईव्ह सामना पाहता येणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना १३ फेब्रुवारी पासून एमए चिदंबरम स्टेडियम येथे खेळवला जात आहे. या स्टेडियमवरील ३ स्टँड हे २०१२ नंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी खुले होणार आहे. या ३ स्टँडवर वेगवेगळ्या कारणांमुळे बंदी घालण्यात आली होती. २०११ च्या विश्व कप नंतर हे तीनही स्टँड प्रेक्षकांसाठी बंद करण्यात आले होते.
या तीन स्टँड मध्ये अधिकतम १२,००० प्रेक्षक ( प्रत्येकी चार हजार) सामना पाहू शकतात. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने रविवारी सांगितले की, दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ९ फेब्रुवारी पासून तिकीट विक्री सुरू होईल. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे सचिव आरएस रामसानी यांनी सांगितले की १५,००० तिकीटे विक्री साठी उपलब्ध असतील.