“मविआ सरकार पाडण्यासाठी १५० बैठका, बंड पुकारणारा मी पहिला आमदार” – तानाजी सावंत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ मार्च २०२३ । मुंबई । २०१९ च्या राज्यातील सत्तानाट्यानंतर अवघ्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिवसेनेच्या ४० आमदारांनी वेगळी भूमिका घेत थेट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वालाच आव्हान दिले. आमदारांनी पाठिंबा काढल्यामुळे मविआ सरकार अल्पमतात आले. हे सरकार पाडण्यासाठी १००-१५० बैठका झाल्या. सरकार उलथवल्याशिवाय शांत बसणार नाही अशी प्रतिज्ञा मी घेतली होती असा गौप्यस्फोट मंत्री तानाजी सावंत यांनी केला.

मंत्री तानाजी सावंत म्हणाले की, २०१९ ला निवडणुका झाल्या, जनतेने शिवसेना-भाजपा युतीचे १८० हून अधिक उमेदवार निवडून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावून जनतेकडे मते मागितली. २०१४ च्या सत्ताधाऱ्यांना पुन्हा २०१९ मध्ये सत्तेत येण्याचा जनादेश लोकांनी दिला. ही वस्तूस्थिती आहे. तेव्हा युतीत मिठाचा खडा टाकल्याशिवाय युती संपणार नाही हे शरद पवारांना कळाले. तेव्हा उद्धव ठाकरेंना ही आघाडी करू नका असं सांगणारा पहिला आमदार मी होतो. साहेब, यांच्या नादाला लागाल तर आत्मघात ठरेल असं मी उद्धव ठाकरेंना म्हटलं असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत पक्षाचे वाटोळे होईल हा निर्णय घेऊ नका, पहिला शिवसैनिक आणि आमदार मीच होतो. हा सल्ला दिल्यामुळे त्यावेळच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंतला दूर ठेवले. २०१९ नंतरचे मी सांगतो. सत्ता परिवर्तनाचे काम सुरू होते. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि माझ्यात जवळपास १०० ते १५० बैठक झाल्या. त्यावेळी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रत्येक आमदाराचे मी मन वळवत होतो आणि उघड माथ्याने हे करत होतो. कुणाला लपवून करत नव्हतो असंही तानाजी सावंत म्हणाले.

दरम्यान, मी जे बोलतो ते करून दाखवतो. ३० डिसेंबर २०१९ ला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. ३ जानेवारीला सुजितसिंह ठाकूर, मी स्वत: देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाने पहिल्यांदा बंडखोरी करून धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजपाची सत्ता आणली. त्यावेळी बंडाचे निशाण फडकवणारा तानाजी सावंत होता. पुन्हा मातोश्रीचे पायरी चढणार नाही असं सांगणारा मी पहिला होतो. हे सरकार उलथवल्याशिवाय तानाजी सावंत गप्प बसणार नाही याची प्रचिती तुम्हाला आली असा टोला तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.


Back to top button
Don`t copy text!