पोलीस सेवेत १५ नवीन बोलेरो वाहन दाखल; २४ तास सेवा देणाऱ्या पोलीस विभागाची कार्यक्षमता अधिक गतिमान होणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, चंद्रपूर, दि. ११ : पोलीस विभागाकरिता जिल्हा नियोजनच्या विकास निधीतून खरेदी करण्यात आलेली महिंद्रा बोलेरो कंपनीची नवीन १५ वाहने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे आज हस्तांतर‍ित करण्यात आली. या वाहनाचा उपयोग २४ तास सेवा देणाऱ्या पोलीस विभागाला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व पोलीस विभागाची कार्यक्षमता अधीक गतिमान करण्यासाठी होईल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अरवींद  साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते.

वाहनांमध्ये महिंद्रा डिफेन्स सिस्टिम या कंपनीने सर्व तांत्रिक सहाय्य पुरविलेले आहे. या वाहनाच्या  माध्यमातून गुन्हेगारीवर आळा बसून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास पोलिसांना मोठी मदत होणार असल्याचे मत खा. बाळू धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले.

पोलीस विभागाद्वारे 112 हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या क्रमांकावर अडचणीच्या वेळी संपर्क साधल्यास जीपीएस लोकेशनद्वारे व्यक्तीशी संपर्क साधला जातो व पोलिसांमार्फत वेळेवर मदत पोहोचविल्या जाते.

जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनला इमर्जन्सी रिस्पॉन्स वेहिकल उपलब्ध करून देण्यात येणार असून नवीन वाहनामुळे गरजू  नागरिकांना तात्काळ प्रतिसाद मिळण्यास मदत होईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी यावेळी दिली.


Back to top button
Don`t copy text!