शिंदेनगरला 15 एकर ऊस आगीपासून वाचला

ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे गावातील सर्व ग्रामस्थ आले मदतीला


स्थैर्य, फलटण, दि. 12 नोव्हेंबर : शिंदेनगर ता. फलटण येथील ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी व तात्काळ वापरामुळे 15 एकर ऊस वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. गावातील कल्पना शिंदे, राजलक्ष्मी शिंदे, संपत जगदाळे, संकेत शिंदे यांच्या ऊसाला सोमवार (दि. 12) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागलेली कळाली. याची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील संतोष खिलारी यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन 18002703600 नंबरवरून संपूर्ण गावाला कळविली आणि काही वेळातच तेथे गावकरी मदतीसाठी धावले व उसाला लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने आटोक्यात आणण्यात यश आल्याने परिसरातील उर्वरीत 15 एकर ऊस आगीपासून वाचविण्यात यश आले.

शिंदेनगरचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व पोलीस पाटील यांच्या प्रयत्नातून गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी राबविली जात आहे. विविध सूचना देण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा विविध सूचना देण्यासाठी 15 वेळा वापर करण्यात आला आहे. सातारा जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद छत्रपती सातारा यांचा संयुक्त उपक्रम असणार्‍या ग्राम सुरक्षा यंत्रणेत जिल्ह्यातील 1230 गावे सहभागी आहेत.जिल्ह्यातील 9.38 लाख नागरिक यंत्रणेत सहभागी आहेत.आजवर जिल्ह्यात 15935 वेळा यशस्वी वापर करण्यात आला आहे.

संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600/9822112281 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जात असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होत आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा यशस्वी वापर करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडून देण्यात आले आहेत.


Back to top button
Don`t copy text!